spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी २७ कोटींचा निधी मंजूर; खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

हंसराज,भंडारा :- केंद्रीय रस्ते निधी (CRF) अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील तीन महत्त्वपूर्ण रस्ते विकासकामांना मंजुरी मिळाली असून, यासाठी तब्बल २७ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. स्थानिक खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि विकासाभिमुख पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले आहे. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे ३४.१० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे रुंदीकरण व सुधारीकरण करण्यात येणार असून ग्रामीण भागातील दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे.

मंजूर झालेल्या विकासकामांमध्ये देव्हाळा–करडी–साकोली या १४.६० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सुधारीकरणासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गामुळे परिसरातील अनेक गावांचा प्रवास अधिक वेगवान व सुलभ होईल. दुसऱ्या टप्प्यात आंबाडी–सिल्ली–मानेगाव–आंभोरा (प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १८) या ३ किलोमीटर रस्त्याचे सुधारीकरण आणि किलोमीटर ०/८०० वरील लहान पुलाच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या पुलामुळे पावसाळ्यात होणारी वाहतुकीची कोंडी कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होईल. तसेच, तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी–कवलेवाडा–सोंड्या–महालगाव ते राज्य महामार्ग क्रमांक ३५५ (प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ७) या १६.५० किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत झाल्याशिवाय शेतकऱ्यांचा आर्थिक विकास आणि ग्रामीण भागाचा कायापालट शक्य नाही. हे रस्ते दर्जेदार झाल्यास शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेणे सोयीचे होईल, विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांत वेळेत पोहोचता येईल आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळणे शक्य होणार आहे. त्यामुळे ही मंजुरी केवळ रस्त्यांची नसून जनसामान्यांच्या दैनंदिन गरजा सुलभ करणारी ठरणार आहे.

या यशाबद्दल भावना व्यक्त करताना खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी सांगितले की, “विकास हा केवळ कागदावर दिसणारा आकडा नसून तो सर्वसामान्यांच्या जगण्यात प्रत्यक्ष जाणवला पाहिजे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाला रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे कर्तव्य आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करून जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा हा प्रयत्न अविरत सुरू राहील.” या विकासकामांना मंजुरी मिळाल्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Popular Articles