spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हाधिकारी यांनी दिलेला शब्द पाळला…….

– यवतमाळ जिल्ह्यात खरीप पिकांच्या संरक्षणासाठी व चाऱ्याच्या नियोजनासाठी मध्यम व लघु प्रकल्पातून पाणी सोडण्यास सुरुवात

– पालकमंत्री संजय राठोड यांच्या निर्देशानुसार कार्यवाही

यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामुळे आणि अपुऱ्या पावसामुळे शेती पिकांवर अत्यंत विपरीत परिणाम झाला आहे. कपाशीवर विविध किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे तसेच पिकांची वाढ खुंटल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाल्याने, शेतात उभ्या असलेल्या खरीप पिकांचे नुकसान टाळण्यासाठी व पिकांना तातडीने सिंचन संरक्षण मिळण्यासाठी शेतकरी वर्गाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकल्पांमधील उपलब्ध जलसाठ्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली होती.

शेतकऱ्यांची ही तीव्र अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहेत.

नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण भासणार नाही याची खबरदारी घेत, तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करून व स्थानिक परिस्थितीचा सखोल विचार करून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील विविध मध्यम, लघु आणि मोठ्या जलप्रकल्पांतून खरीप पिकांच्या संरक्षणासाठी व चाऱ्याच्या नियोजनाकरिता पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दिनांक १४/१०/२०२६ (सायंकाळ पर्यंत) विविध प्रकल्पांमधून सोडण्यात आलेल्या पाण्याची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:

बोरगांव मध्यम प्रकल्प (ता. यवतमाळ): ०.०८ दलघमी (MCM) पाणी सोडण्यात आले आहे. सायखेडा मध्यम प्रकल्प (ता. केळापूर): ०.५० दलघमी (MCM) पाणी सोडण्यात आले आहे. टाकळी लघु प्रकल्प (ता. यवतमाळ): ०.४९ दलघमी (MCM) पाणी सोडण्यात आले आहे. राजुर लघु प्रकल्प (ता. कळंब): ०.२० दलघमी (MCM) पाणी सोडण्यात आले आहे. इटोला लघु प्रकल्प (ता. दिग्रस): ०.०६ दलघमी (MCM) पाणी सोडण्यात आले आहे. बेंबळा मोठा प्रकल्प: खरीप पिकांच्या सिंचनासाठी मुख्य कालव्यातून १५ क्युमेक (Cumec) वेगाने पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या खरीप पिकांना संजीवनी मिळणार असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटण्यास मोठी मदत होणार आहे. पाणी सोडताना पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, उपलब्ध साठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. संबंधित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी या पाण्याचा वापर पिकांच्या संरक्षणासाठी योग्य पद्धतीने करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

“जिल्ह्यातील दुष्काळस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध सवलती लागू केल्या असून दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना केल्या जात आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांकडून शेतपिकासाठी प्रकल्पातील पाण्याची मागणी होत होती. त्याअनुषंगांने जिल्हाधिकारी यांना नियोजन करुन मागणीनुसार पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत असून जलसंधारणाची कामे केली जात आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे.”

– पालकमंत्री संजय राठोड, यवतमाळ

Popular Articles