spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वाचन प्रेरणा दिनानिमित्त गडचिरोलीत ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

– वाचनाची सवय जोपासण्याचे आवाहन

गडचिरोली :- अभिजात मराठी भाषा सन्मान सप्ताह व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा मराठी भाषा समिती आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम आणि कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय, चामोर्शी येथील मराठी विभागप्रमुख प्रा. अजिंक्य भांडारकर उपस्थित होते.

वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण वाचन आवश्यक असून, विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा पुरेपूर उपयोग करावा, असे आवाहन श्री. पेंदाम यांनी केले. भाषा ही आपली अस्मिता व ओळख असून, मराठी भाषेला समृद्ध वैचारिक वारसा लाभला आहे. साहित्य हे समाजसुधारणेचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची सवय जोपासण्याचा सल्ला दिला.

प्रा. भांडारकर यांनी कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीचा उल्लेख करून त्यांचे साहित्य वाचण्याचे आवाहन केले. मराठीला मिळालेल्या अभिजात भाषेच्या दर्जाचे महत्त्व स्पष्ट करताना, या दर्जामुळे मराठी शिक्षणाला चालना मिळण्यासह रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. मराठीचा दैनंदिन व्यवहारात वापर वाढवावा आणि मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी समाजमाध्यमांचाही प्रभावी उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सु. श्री. गजभारे यांनी मान्यवरांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले व प्रास्ताविक केले.

कार्यक्रमास वाचक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles