spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

केवळ पदवी नव्हे, तर कौशल्य आत्मसात करून तरुणांनी स्वावलंबी व्हावे – डॉ. पुरणचंद्र मेश्राम

– कामठी येथे ‘युवा सक्षमीकरण व रोजगार प्रशिक्षण शिबिर’ उत्साहात संपन्न; ॲड. सुलेखा कुंभारे यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन

कामठी :- धम्मचक्रप्रवर्तन दिन तसेच कर्मवीर ॲड. दादासाहेब कुंभारे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून कॉलेज ऑफ सोशल वर्क, कामठी आणि दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑक्टोबर रोजी भव्य ‘युवा सक्षमीकरण व रोजगार प्रशिक्षण शिबिर’ उत्साहात पार पडले. या शिबिरात शेकडो युवक-युवतींना आधुनिक कौशल्ये, शासकीय योजना आणि स्वयंरोजगाराच्या विविध संधींविषयी तज्ज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांच्या हस्ते झाले. विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या शिल्पकार तथा माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. मंचावर सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग केंद्राचे (MSME) उपसंचालक वाय. बी. बघेल, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी अभय नाथ, खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) अधिकारी मोनिका मंढराह, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. राष्ट्रपाल मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर ॲड. दादासाहेब कुंभारे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली.

प्रचलित पदवीसोबत कौशल्य काळाची गरज : डॉ. पुरणचंद्र मेश्राम

उद्घाटकीय भाषणात डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा वेध घेत आंबेडकरी चळवळीतील कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले, “सध्याचे शिक्षण केवळ पदवी देण्यापुरते मर्यादित राहिले असून विद्यापीठांतून मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित बेरोजगार बाहेर पडत आहेत. आज केवळ २२ टक्के शासकीय नोकऱ्या शिल्लक असून ७८ टक्के वाटा खासगी क्षेत्राकडे गेला आहे. अशा वेळी चीन-जपानसारख्या देशांचा आदर्श घेत आपल्या युवकांनी स्वतंत्र कौशल्यांमध्ये पारंगत झाले पाहिजे. कौशल्याधारित शिक्षणच तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देऊ शकते.”

संघर्षातून प्रेरणा घेऊन तरुणांनी संधींचे सोने करावे : ॲड. सुलेखा कुंभारे

अध्यक्षीय भाषणात ॲड. सुलेखा कुंभारे यांनी युवकांना सकारात्मक राहण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा वारसा पुढे नेत दादासाहेब कुंभारे यांनी विडी कामगारांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला आणि त्यांना शासकीय स्तरावर मजुरांचा दर्जा मिळवून दिला. आज तरुणांची संख्या प्रचंड असली तरी त्या तुलनेत रोजगाराच्या संधी अपुऱ्या वाटत असल्याने नैराश्य पसरत आहे. मात्र, युवकांनी खचून न जाता उपलब्ध योजना व कौशल्यांचे प्रशिक्षण घेऊन उद्योजकतेकडे वळावे. अशा शिबिरांच्या माध्यमातून तरुणांना स्वावलंबी बनवणे हीच खरी आदरांजली ठरेल.”

तज्ज्ञांकडून उद्योग आणि शासकीय योजनांचे मार्गदर्शन

तांत्रिक सत्रात MSME चे उपसंचालक वाय. बी. बघेल, अभय नाथ आणि KVIC च्या मोनिका मंढराह यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध रोजगार व स्वयंरोजगार योजनांची विस्तृत माहिती दिली. यामध्ये:

निर्यात व्यापार आणि व्यवसायासाठी लागणारे संवाद कौशल्य (Communication Skills).

उद्योग आधार व विविध योजनांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया.

बँकांकडून मिळणारे अर्थसाहाय्य, शासकीय अनुदान आणि निधी व्यवस्थापन.

उद्योग क्षेत्रात वेळेचे व्यवस्थापन व सातत्य टिकवण्याचे मार्ग.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी यांनी केले. शिबिर आयोजनामागील उद्देश विशद करताना त्यांनी सामाजिक बांधिलकीतून तरुणांना दिशा देण्याचा संस्थेचा मानस व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक प्रा. डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. राहुल जुनगरी यांनी मानले.

या रोजगार प्रशिक्षण शिबिराला कॉलेज ऑफ सोशल वर्क, कामठी व दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी, परिसरातील तरुण-तरुणी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles