यवतमाळ/प्रतिनिधी :- कर्ज देणाऱ्या व्यक्तींकडून वारंवार फोन करून मानसिक त्रास व धमकी दिल्यामुळे माझे वडील गेल्या दोन दिवसांपासून घरातून निघून गेले असून, त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही, असा गंभीर आरोप त्यांचा मुलगा शाहेबाज खान यांनी केला आहे.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, घरातून निघताना वडिलांनी आपली गाडी, मोबाईल व इतर वस्तू घरातच ठेवून गेल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या मोबाईल क्रमांक 9850186588 वर गेल्या दोन दिवसांत कर्जाच्या पैशांसाठी अनेक फोन आले असून, या फोनवरील संभाषणांची रेकॉर्डिंग कुटुंबीयांकडे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे.
काही व्यक्तींनी दोन-दोन वर्षांपासून व्याजाची रक्कम वसूल केल्यानंतरही मुद्दल रक्कम बाकी असल्याचे सांगत वारंवार फोन करून पैशांची मागणी केली. तसेच फोनवरून धमकीवजा बोलणे करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
“आम्ही वडिलांच्या मोबाईलवर आलेले फोन आणि त्यातील संभाषणांच्या रेकॉर्डिंग ऐकल्या आहेत. वडिलांना काही कमी-जास्त झाले किंवा त्यांच्या जीवितास कोणतीही हानी झाली, तर त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आतापर्यंत फोन करून त्रास देणाऱ्या संबंधित व्यक्तींची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा मुलगा शाहेबाज खान यांनी दिला आहे.
या प्रकरणातील फोन कॉल्सची रेकॉर्डिंग व इतर उपलब्ध पुरावे पोलिसांकडे देण्यात येणार असून, वडिलांचा तातडीने शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे घरी आणावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी होणे बाकी असून, संबंधित व्यक्तींची बाजू अद्याप समोर आलेली नाही.








