– ड्रॅगन पॅलेस परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळला
– ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ७० मीटरचा पंचशील ध्वज ठरणार मुख्य आकर्षण
– दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेससाठी विशेष ‘आपली बस’ सेवा
कामठी :- नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेतल्यानंतर लाखो अनुयायांचे श्रद्धास्थान ठरलेल्या कामठी येथील आंतरराष्ट्रीय ड्रॅगन पॅलेस टेम्पलमध्ये यंदाचा ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अत्यंत भव्य आणि अभूतपूर्व उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने १९ आणि २० ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय धम्मचक्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, देशभरातून येणाऱ्या लाखो बौद्ध उपासक-उपासिकांच्या स्वागतासाठी संपूर्ण ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाला आहे. रात्रीच्या वेळी झगमगणाऱ्या दिव्यांच्या लखलखाटामुळे ड्रॅगन पॅलेसचे विहंगम आणि नयनरम्य रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या ऐतिहासिक महोत्सवाची संपूर्ण रूपरेषा ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख तथा माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी जाहीर केली आहे.
महोत्सवाचे प्रमुख आकर्षण व कार्यक्रम रूपरेषा :
१. १९ ऑक्टोबर : भव्य ‘शांती पंचशील मार्च’ व ७० मीटरचा पंचशील ध्वज
शांती मार्च : १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनापर्यंत भव्य ‘शांती पंचशील मार्च’ काढण्यात येईल.
सहभाग : या शांती मार्चमध्ये धम्मसेवक, धम्मसेविका, उपासक-उपासिका, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील.
जागतिक संदेश : तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी व क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वात पोहोचविण्याचा संकल्प या मार्चद्वारे करण्यात येईल.
७० मीटरचा पंचशील ध्वज यंदाचा हा ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस असल्याने याचे औचित्य साधून मंदिर परिसरात तब्बल ७० मीटरचा ऐतिहासिक पंचशील ध्वज उभारण्यात येणार आहे.
२० ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय भिक्षू संघाची उपस्थिती व महामानवाला मानवंदना
विशेष बुद्ध वंदना : २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पूज्य भदंत डॉ. डी.धम्मरतन, उपाध्यक्ष इंटर नॅशनल कौन्सिल ऑफ युनायटेड नेशन डे ऑफ वैशाख आणि पूज्य भदंत डॉ. पियोरतन महाथेरो, म्यांमार,पूज्य भदंत आगाधम्म, त्रिपुरा, पूज्य भदंत डॉ. चिंचाल मेत्तानंद
यांचे सह थायलंड, श्रीलंका यांसह विविध बौद्ध राष्ट्रांतील पूज्य भिक्षू संघाच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना पार पडेल.
मानवंदना : या आंतरराष्ट्रीय बुद्ध वंदनेच्या माध्यमातून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र आदरांजली व मानवंदना अर्पण करण्यात येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन
बुद्ध वंदनेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपट व संघर्षावर आधारित ‘दुर्मिळ फोटो संग्रहाचे प्रदर्शन’ भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन अभ्यासक आणि अनुयायांसाठी विशेष पर्वणी ठरेल.
“पाण्यानी पेटला वणवा” या नाटकाचे सादरीकरण
युगंधर एल एल पी प्रस्तुत राजकुमार बडोले लिखीत “पाण्यानी पेटला वणवा” या नाटकाचे आयोजन मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र येथे आयोजीत करण्यात आले आहे. या नाटकामध्ये मुंबई येथील कलावंतांचा प्रमुख सहभाग आहे.
प्रबोधनात्मक बुद्ध-भीम गीतांचा संगीतमय सोहळा
१९ आणि २० ऑक्टोबर या दोन्ही दिवशी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसरात प्रबोधनात्मक बुद्ध-भीम गीतांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल.
या कार्यक्रमात मुंबईसह विदर्भातील स्थानिक नामवंत कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अनुयायांसाठी खास वाहतूक व्यवस्था
दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस’ विशेष बससेवा
दीक्षाभूमीवर देश-विदेशातून येणाऱ्या लाखो अनुयायांना कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे दर्शनासाठी जाता यावे, यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे ‘आपली बस’ची चोख व्यवस्था करण्यात आली आहे:
दिवसरात्र बससेवा : ही विशेष बससेवा सकाळपासून रात्रीपर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे.
प्रमुख स्थानकांशी जोडणी
दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस व्यतिरिक्त मुख्य बसस्थानक, नागपूर रेल्वेस्थानक, अजनी रेल्वेस्थानक, मोरभवन आणि एमपी स्टँड येथे ये-जा करण्यासाठीही बसेसची विशेष सोय करण्यात आली आहे.
एलईडी स्क्रीनद्वारे माहिती
प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवेचे वेळापत्रक आणि माहिती ठिकठिकाणी एलईडी (LED) स्क्रीनद्वारे प्रसारित केली जाणार आहे.
भाविकांच्या स्वागतासाठी सर्व सोयी-सुविधा सज्ज
नागपूरच्या दीक्षाभूमीवरून ड्रॅगन पॅलेस टेम्पलकडे लाखो अनुयायी रवाना होत असल्याने आतापासूनच परिसरात जनसागर उसळला आहे.
भव्य वॉटरप्रूफ मंडप
उन्हा-पावसापासून संरक्षणासाठी भव्य वॉटरप्रूफ डोम आणि लाकडी फ्लोअरिंगची उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
आरोग्य व सुरक्षा : शुद्ध पिण्याचे पाणी, फिरते दवाखाने, २४ तास रुग्णवाहिका, चोख पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांची चमू तैनात करण्यात आली आहे.
अन्नदान व सेवा : विविध सामाजिक संस्थांतर्फे ठिकठिकाणी भोजनदानाची अविरत सोय करण्यात आली आहे.
“शांतता, करुणा आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलमध्ये होणाऱ्या या दोन दिवसीय ऐतिहासिक धम्म महोत्सवात सर्व जनता आणि उपासक-उपासिका मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.








