नागपूर :- परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर 70 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महामानवाच्या अभिवादनासाठी येणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायी, नागरिक आणि वीज ग्राहकांना महावितरणच्या आधुनिक, ग्राहकाभिमुख सेवांची माहिती सहज मिळावी, तसेच विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती व्हावी यासाठी महावितरणच्या वतीने दीक्षाभूमी परिसरात विशेष ‘माहिती केंद्राची’ उभारणी करण्यात आली आहे. या केंद्राचे उद्घाटन सोमवारी (19 ऑक्टोबर) नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते दिक्षाभुमी उपकेंद्राच्या प्रांगणात पार पडले.
दीक्षाभूमीवर दरवर्षी भरणाऱ्या या महासंगमात हजारो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, प्रशासकीय स्तरावर यंदा वीज ग्राहकांशी थेट संवाद साधण्याचा हा एक आगळावेगळा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी मुख्य अभियंता व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रफुल लांडे, नागपूर ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, काँग्रेसनगर विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे, महाल विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. गजानन जयस्वालम सिव्हील लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता धम्मदिप फुलझले आणि बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत टेंभेकर यांचेसह सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता हेमराज ढोके, महावितरणचे अनेक अभियंते, अधिकारी, कर्मचारी, भोजनदान व पुस्तक वितरण समितीचे सदस्य आणि विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अमरदिप बागडे यांच्या प्रास्ताविकाने झाली, सूत्रसंचालन पांडूरंग कुकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश पोफळी यांनी मानले.
दोन दिवस चालणाऱ्या या माहिती केंद्राच्या माध्यमातून महावितरणतर्फे पर्यावरणपूरक सौर ऊर्जेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार केला जात आहे. यामध्ये विशेषतः घरगुती ग्राहकांसाठी अतिशय लाभदायक ठरणारी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’, राज्य सरकारची ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजना’, शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग सुकर करणारी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ आणि ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ यांसारख्या महत्त्वाच्या योजनांसह विद्युत सुरक्षेसाठी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली जात आहे. नागरिकांना या तांत्रिक बाबी आणि योजना चटकन समजून घेता याव्यात, यासाठी आकर्षक माहितीपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स आणि दृकश्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) माध्यमातून माहिती दाखवण्याची सोय करण्यात आली आहे.
या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, केवळ योजनांची माहिती देणे हा नसून दैनंदिन जीवनात वीज वापरताना कोणती काळजी घ्यावी, पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात वीज अपघात कसे टाळावेत याविषयीची ‘विद्युत सुरक्षा’ लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. याचबरोबर, महावितरणचे डिजिटल मोबाईल ॲप आणि ऑनलाईन बिल भरणा प्रणालीचा वापर कसा करावा, याचे प्रत्यक्ष मार्गदर्शनही येथील कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मिळत आहे. दीक्षाभूमीला भेट देणाऱ्या जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी आणि नागरिकांनी या माहिती केंद्राला आवर्जून भेट द्यावी आणि महावितरणच्या विविध डिजिटल सेवा व लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.








