spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बोधगयेचे दर्शन नागपुरात; ५६ फुटी महाबोधी महाविहाराने नागरिक भारावले !

– सम्राट अशोक विजयादशमीला बुद्ध पार्कमध्ये जनसागर; २००० वर्षांचा धम्माचा इतिहास एकाच छताखाली:

नागपूर :- बिहारमधील बोधगयेच्या महाबोधी महाविहाराची ५६ फुटी भव्य प्रतिकृती नागपूरकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. नागपूर बुद्धिस्ट कॉन्सोर्टियम (NBC) तर्फे बुद्ध पार्क, बुद्ध नगर येथे आयोजित महाबोधी टेम्पल वर्ल्ड हेरिटेज एक्स्पो २०२६ मध्ये नागरिकांना बोधगयेचे दर्शन नागपुरातच घडत आहे. प्रतिकृती पाहून अनेक नागरिक भावूक झाले. सम्राट अशोक विजयादशमीनिमित्त २० ऑक्टोबर रोजी, बुद्ध पार्कमध्ये हजारो बौद्ध अनुयायांनी कुटुंबासह गर्दी केली. या एक्स्पोमध्ये सम्राट अशोकांच्या धम्मप्रसारापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १९५६ मधील ऐतिहासिक धम्मदीक्षेपर्यंतचा सुमारे २००० वर्षांचा धम्मवारसा साकारण्यात आला आहे. यावेळी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी एक्स्पोला भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. त्यांचे स्वागत बौद्ध परंपरेनुसार पंचशील दुपट्टा अर्पण करून करण्यात आले.

युवकांना धम्माशी जोडण्याचा उद्देश हा उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे मुख्य आयोजक राकेश धारगावे यांनी सांगितले. हा एक्स्पो संपूर्ण NBC टीमच्या सामूहिक मेहनतीचे फलित असल्याचेही त्यांनी नमूद केले. हा एक्स्पो २२ ऑक्टोबर पर्यंत बुद्ध पार्क, बुद्ध नगर, नागपूर येथे सुरू राहणार असून, नागरिकांनी कुटुंबासह भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Popular Articles