– मनपाच्या कृत्रिम जलकुंडांत ६ हजार ३६२ घट अन् १४० श्री दुर्गा देवी मूर्तींचे विसर्जन
नागपूर :- शहरात नवरात्री उत्सवाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या घटस्थापना व श्री दुर्गा उत्सवाचे आगमन झाल्यानंतर श्री दुर्गा देवीच्या मूर्तीचे व नवरात्रीतील घटांचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, यासाठी मनपाने शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले आहेत. मोठ्या आकाराच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गोरेवाडा, पोलीस लाईन टाकळी व कोराडी येथे कृत्रिम जलकुंड व्यवस्था करण्यात आली. शहरातील विविध कृत्रिम तलाव व जलकुंडांमध्ये मंगळवारी (ता.२०) रोजी एकूण १४० श्री दुर्गा देवींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच विविध झोन अंतर्गत घट विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम कुंडात ६ हजार ३६२ घट विसर्जित करण्यात आले.
महापौर निता ठाकरे व मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात घट विसर्जन व मूर्ती विसर्जन व्यवस्था करण्यात आली. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कृत्रिम तलावांमध्ये क्रेनची व्यवस्था करून विसर्जनासाठी मदत केली.

झोननिहाय विसर्जन:
लक्ष्मीनगर झोनमध्ये १ कृत्रिम तलाव उभारण्यात आला असून, येथे ७४० नवरात्री घट आणि २४ श्री दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत १ हजार ८३५ घटांचे विसर्जन करण्यात आले. धंतोली झोनमध्ये १ कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली असून, येथे १ हजार ४५७ घट व ९ मूर्तींचे विसर्जन झाले. नेहरूनगर झोनमध्ये १ कृत्रिम तलावाची व्यवस्था असून, येथे ३५१ घट व २४ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गांधीबाग झोन येथे ८७४ घटांचे विसर्जन करण्यात आले. सतरंजीपुरा झोन येथे २८० घटांचे विसर्जन करण्यात आले. लकडगंज झोन येथे ७२५ घटांचे विसर्जन तसेच मंगळवारी झोन अंतर्गत १०० घटांचे विसर्जन करण्यात आले. याशिवाय पोलीस लाईन टाकळी येथील कृत्रिम जलकुंडात १०, गोरेवाडा रिंग रोड जलकुंडात ४२ आणि कोराडी जलकुंडात ३१ श्री दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.








