– मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा फज्जा
किशोर साहू, मौदा :- खात-रेवराल जि प क्षेत्रातील गट ग्रामपंचायत धर्मापुरी अंतर्गत येणाऱ्या नवरगाव येथील शेतकरी राजेश लक्ष्मण बावनकुळे यांची शेती मोरगाव शिवारात असून, त्या शेतात सोलर लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत ९ जून ला संपूर्ण रक्कम ३०,६९४ (अक्षरी तीस हजार सहाशे चौऱ्यांन्नव रुपये) कंपनीच्या खात्यात ऑनलाइन जमा केले. कंपनीने नियुक्त केलेली एजन्सी ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर (इंडिया) लिमिटेड च्या प्रतिनिधींनी बावनकुळे यांच्या शेतात सोलर लावण्यासाठी त्यांच्या घरी अर्धवट सामान आणून सोडले आहे. बावनकुळे हे एजन्सीच्या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनी वरून शेतात सोलर लावण्यासाठी मागील चार महिन्यापासून वारंवार संपर्क करीत आहेत, मात्र कंपनीचे प्रतिनिधी भ्रमणध्वरीवर प्रतिसाद देत नाही, कधी दिलेच तर आपल्या शेतात सोलर आज लावून देतो ,उद्या लावून देतो असे म्हणून मागील चार महिन्यापासून सतत टाळाटाळ करीत असल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहे. याबाबत सदर प्रतिनिधीने सुद्धा आज बुधवार (ता. २१ ऑक्टोबर) ला रात्री ८:३० वाजता दरम्यान सोलर लावणाऱ्या एजन्सीच्या प्रतिनिधीच्या भ्रमणध्वनीवर दोनदा संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा फज्जा उडालेला आहे.








