– लेखिका अनुप्रिता मोझेस पटेल यांचे आगामी पुस्तक २३ ऑक्टोबरला नागपुरात प्रकाशित होणार; दिव्यांग महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘शरण फाउंडेशन’चा पुढाकार
नागपूर :- महिलांनी आयुष्यभर इतरांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःची स्वप्ने, आनंद आणि अस्तित्व यांच्याकडे दुर्लक्ष करू नये, तसेच स्वतःच्या आत्मसन्मानाला प्राधान्य देणे हा स्वार्थ नसून धैर्य, आत्मभान आणि स्वतःवर प्रेम करण्याचा अधिकार आहे, असा प्रेरणादायी संदेश लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अनुप्रिता मोसेस पटेल यांच्या आगामी *‘When She Chose Herself’* या पुस्तकातून देण्यात आला आहे. महिला सक्षमीकरण, आत्मसन्मान आणि स्वतःसाठी उभे राहण्याचे धैर्य या विषयांवर आधारित असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वा. नागपुरातील सिव्हिल लाइन्स परिसरातील व्हीसीए स्टेडियमजवळ, जैका मोटर्सच्या वर असलेल्या क्रॉसवर्ड बुक स्टोअर येथे होणार आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत पुस्तकाची संकल्पना, महिलांच्या जीवनातील संघर्ष आणि शरण फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती देण्यात येणार आहे. अनेक महिला कुटुंबाच्या आणि समाजाच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःच्या इच्छा, स्वप्ने आणि आनंद यांना दुय्यम स्थान देतात. वर्षानुवर्षे इतरांसाठी जगल्या नंतर स्वतःच्या मनातील भावनांचा विचार करण्याची वेळ आल्यावर ‘मी सर्वांसाठी आयुष्य जगले, पण माझे स्वतःचे काय ?’ असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. याच भावनिक वास्तवाला स्पर्श करणारे हे पुस्तक महिलांना स्वतःची किंमत ओळखण्याची, हरवलेली स्वप्ने पुन्हा शोधण्याची आणि स्वतःच्या आनंदाला महत्त्व देण्याची प्रेरणा देते. स्वतःची निवड करणे म्हणजे इतरांना नाकारणे नव्हे, तर आपणही प्रेम, सन्मान, आनंद आणि काळजी मिळवण्यास पात्र आहोत, याची जाणीव करून घेणे होय, हा पुस्तकाचा मुख्य विचार आहे. अनुप्रिता मोझेस पटेल या लेखना सोबतच सामाजिक कार्यातही सक्रिय असून, शरण फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक समावेशन आणि विशेषतः दिव्यांग महिला व मुलींसाठी संधी निर्माण करण्याच्या दिशेने कार्य करतात. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील विविध गावांमध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग महिलांशी संवाद साधण्यात आला आहे. त्यांच्या जीवनातील अडचणी, सामाजिक अडथळे, उपेक्षा आणि संघर्ष समजून घेत त्यांच्यातील क्षमता, आत्मविश्वास आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द ओळखण्याचा प्रयत्न या उपक्रमांतून करण्यात आला. दिव्यांग महिलांकडे केवळ सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी त्यांच्यातील कौशल्य, महत्त्वाकांक्षा आणि क्षमता यांना संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका शरण फाउंडेशनने मांडली आहे. शिक्षण, क्रीडा, सामाजिक सहभाग आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून दिव्यांग महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समान संधी मिळवून देणे, हा फाउंडेशनच्या कार्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. याच उद्देशाने दिव्यांग महिलांसाठी व्हीलचेअर बास्केटबॉल प्रशिक्षणाच्या संधी विकसित करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. यामध्ये पोर्तुगालमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणाच्या संभाव्य संधींचाही विचार करण्यात येत आहे. अशा उपक्रमांमुळे दिव्यांग महिलांचा आत्मविश्वास वाढण्या सोबतच त्यांना सांघिक भावना, क्रीडा सहभाग आणि स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते.
When She Chose Herself’ हे पुस्तक केवळ साहित्यकृती न राहता महिलांच्या आत्मसन्मानाविषयी व्यापक जनजागृती घडवून आणणारे माध्यम ठरावे, अशी लेखिकेची अपेक्षा आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळावी, समाजात महिलांच्या भावनिक गरजा आणि स्वप्नांविषयी सकारात्मक चर्चा घडावी, तसेच शरण फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांना स्वयंसेवक, समर्थक आणि संसाधनांच्या माध्यमातून मदत मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
लेखिकेचा महिलांसाठी संदेश:
“अनेक पिढ्यांपासून महिलांना स्वतःच्या आधी इतरांचा विचार करण्याची शिकवण दिली गेली आहे. ‘When She Chose Herself’ या पुस्तकातून प्रत्येक महिलेला तिची स्वप्ने महत्त्वाची आहेत, तिचा आनंद महत्त्वाचा आहे आणि तिचे आयुष्यही महत्त्वाचे आहे, हे सांगण्याची माझी इच्छा आहे. स्वतःची निवड करणे म्हणजे इतरांचा त्याग करणे नव्हे; तर आपणही इतरांना ज्या प्रेमाची आणि काळजीची देणगी देतो, त्याच प्रेमाचे आणि काळजीचे हक्कदार आहोत, हे ओळखणे होय. शरण फाउंडेशनच्या माध्यमातून विशेषतः दिव्यांग महिलांना सन्मानाने जगण्याची, संधी मिळवण्याची आणि स्वप्ने पूर्ण करण्याची मोकळीक मिळावी, हा माझा प्रयत्न आहे.”
पुस्तक प्रकाशन सोहळा
येत्या २३ ऑक्टोबर रोजी, सायंकाळी ५.३० वाजता. क्रॉसवर्ड बुक स्टोअर, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमात पुस्तकातील विचारांसोबतच शरण फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग महिला व मुलींसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवरही प्रकाश टाकण्यात येणार आहे. महिला सक्षमीकरण, आत्मसन्मान, समावेशकता आणि समान संधी या मूल्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेमार्फत अनुप्रिया पटेल यांनी दिली.








