– २३ ऑक्टोबरला मतदान; ओळखपत्र सोबत ठेवण्याचे आवाहन
हंसराज,भंडारा :- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यात प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील एकूण २१ हजार ३४९ मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अंतिम मतदार आकडेवारीनुसार, एकूण मतदारांमध्ये १३ हजार २४७ पुरुष आणि ८ हजार १०२ महिला मतदारांचा समावेश आहे. इतर प्रवर्गातील मतदारांची नोंद शून्य आहे. निवडणूक प्रक्रियेत सर्व पात्र मतदारांना सहभागी होता यावे, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष व्यवस्था
जिल्ह्यात १ हजार ३४ दिव्यांग मतदार असून, त्यामध्ये ७२८ पुरुष आणि ३०६ महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच, ८० वर्षांवरील ३५ ज्येष्ठ मतदार आहेत. या मतदारांना मतदान केंद्रांवर सहजतेने आणि विनाअडथळा मतदान करता यावे, यासाठी मदती घेता येईल. भंडारा जिल्ह्यातील ३५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे.
ओळखपत्र सोबत ठेवण्याचे आवाहन
मतदानाच्या दिवशी पात्र पदवीधर मतदारांनी निर्धारित वेळेत आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावावा. मतदानासाठी येताना आवश्यक वैध ओळखपत्र सोबत आणावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकशाही प्रक्रियेत मतदानाला महत्त्वाचे स्थान असून, सर्व पात्र मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क जबाबदारीने बजावावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.








