– आरोग्य विभागाकडून गावात विशेष शिबिर; सुमारे १२० रुग्णांवर उपचार, ५० जण पालांदूर रुग्णालयात दाखल
हंसराज, भंडारा :- जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मुरमाडी अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र खराशी येथे २० ऑक्टोबर रोजी आयोजित महाप्रसादानंतर काही नागरिकांना उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू करून गावात विशेष आरोग्य शिबिर आयोजित केले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खराशी येथील गायत्री माता मंदिरात २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुमारे ७०० ते ८०० नागरिकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी काही नागरिकांना त्रास सुरू झाल्याने त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. मुरमाडी व लगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविका गावात दाखल झाल्या.
२१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे १२० रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी २१ रुग्णांना ग्रामपंचायत कार्यालयातील शिबिरात दाखल करून उपचार देण्यात आले, तर ९ रुग्णांना ग्रामीण रुग्णालय, पालांदूर येथे संदर्भित करण्यात आले. इतर रुग्णांना औषधोपचार करून घरी सोडण्यात आले. सुमारे ५० रुग्ण ग्रामीण रुग्णालय, पालांदूर येथे दाखल असून त्यात तीन गर्भवती महिलांचा समावेश आहे. त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे संदर्भित करण्यात आले आहे.
साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले व विधानपरिषद आमदार अविनाश ब्राह्मणकर यांनी खराशी व पालांदूर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पटोले यांनी शिबिराची पाहणी करून दाखल रुग्णांची विचारपूस केली, तसेच उपचारात दिरंगाई होऊ नये, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये यांनीही गाव व रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. श्रीकांत अंबेकर व जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी अनिल बनकर गावात परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
घटनेचे कारण शोधण्यासाठी सात अन्न नमुने, तीन पाणी नमुने आणि पाच रुग्णांचे शौच नमुने संकलित करण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे. आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांमार्फत गावात घरोघरी सर्वेक्षण सुरू असून लक्षणे असलेल्या नागरिकांची तपासणी करून गरजेनुसार त्यांना आरोग्य संस्थेत पाठविले जात आहे. या कामी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.







