– रिपब्लिकन विद्यार्थी संघटनेचा उपक्रम; मोहिनी बारमासे यांचा पुढाकार, शेकडो धम्म अनुयायांचा सहभाग:
नागपूर :- ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रिपब्लिकन विद्यार्थी संघटना, नागपूर शहरच्या वतीने भारतीय संविधान तसेच बुद्ध आणि धम्म, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे आणि मुकनायक यांसारख्या विषयांवरील पुस्तकांचे शेकडो धम्म अनुयायांना मोफत वाटप करण्यात आले. समाजात संविधानिक मूल्यांची रुजवणूक व्हावी, महापुरुषांचे विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहोचावेत आणि वाचनसंस्कृतीला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. संघटनेच्या शहराध्यक्ष मोहिनी बारमासे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मत्स्य व बांधारे विभागाचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दर्जा प्राप्त प्रेमकुमार गजभिये यांच्या हस्ते सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिक बुद्धवंदना घेऊन महापुरुषांच्या विचारांना अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधान, बुद्ध आणि धम्म तसेच महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे आणि मुकनायक यांच्याशी संबंधित विविध पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले. पुस्तके मिळाल्याने अनेक धम्म अनुयायांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाला आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, अँड. लुबेश मेश्राम, संघटक देवेंद्र बागडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बनसोड, कवीवर्य तनुजा नागपुरी, सुमित बनसोड, विक्रम भारद्वाज, सुधीर मुठचरे आणि अँड. खोब्रागडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमातून संविधान, सामाजिक समता, बंधुता आणि महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना आंबेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. जगात प्रत्येक व्यक्तीला संपत्ती, मान- सन्मान, मोक्ष, धन आणि विविध प्रकारच्या प्राप्तीची अपेक्षा असते; मात्र नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो लोकांच्या साक्षीने विज्ञाननिष्ठ, समताधिष्ठित आणि मानवतावादी विचारांचा स्वीकार करण्याचा मार्ग दाखविला. हा केवळ धार्मिक परिवर्तनाचा प्रसंग नव्हता, तर सामाजिक विषमता आणि अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या ऐतिहासिक परिवर्तनाची सुरुवात होती, असे त्यांनी प्रतिपादन केले. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजाने केवळ उत्सव आणि सोहळ्यांपुरते मर्यादित न राहता पुस्तके वाचली पाहिजेत, त्यातील विचार समजून घेतले पाहिजेत आणि ते दैनंदिन जीवनात आचरणात आणले पाहिजेत. भारतीय संविधान, बुद्धांचा धम्म आणि महात्मा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांसारख्या महापुरुषांचे साहित्य समाजातील नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ज्ञान, शिक्षण आणि वैचारिक प्रबोधनाच्या माध्यमातूनच समताधिष्ठित समाजनिर्मितीचा मार्ग अधिक मजबूत होऊ शकतो, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या या पुस्तक वाटप उपक्रमामुळे वाचन, वैचारिक प्रबोधन आणि संविधानिक जाणीव जागृतीला प्रोत्साहन मिळाले. महापुरुषांचे विचार पुस्तकांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचावेत आणि समाजाने परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. रिपब्लिकन विद्यार्थी संघटना, नागपूर शहरच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.








