– विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय, आर्थिक शिस्त आणि आर्थिक साक्षरता रुजविण्याचा अभिनव उपक्रम
खापा, वार्ताहर :- जे एस डब्ल्यू एस्पायर एज्युकेशन प्रोग्राम अंतर्गत मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या सहकार्याने जिजामाता हायस्कूल, खापा येथे ‘चिल्लर बँक’ उपक्रमाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून बचतीची सवय निर्माण करणे, आर्थिक शिस्त रुजविणे आणि पैशांचे योग्य नियोजन करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाला खापा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पियुष बुरडे, नगर उपाध्यक्ष सुनील पाहुणे, शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर गजभिये, शिक्षण सभापती अंजली आनंद मेनकुदळे, नगरसेविका रोशनी डेरे, निशा कटोते व शोभा कारणकर, शाळा समिती सदस्या वनिता सोनेवार, बँक व्यवस्थापक वडे व राजेंद्र भोंगाडे उपस्थित होते. तसेच JSW Aspire Education Program व Magic Bus India Foundation चे क्लस्टर मॅनेजर निलेश नागपुरे, कर्मचारी संदीप तितरमारे, लहू कोरडे, श्वेता गभने, दर्शना खुबाळकर ,शाळेतील शिक्षकवृंद आणि इतर मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना मोहने यांनी केले. लहू कोरडे यांनी प्रास्ताविकातून चिल्लर बँकेचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच पैशांचे योग्य नियोजन करणे, नियमित बचत करणे आणि पैशांचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण सभापती अंजली आनंद मेनकुदळे यांच्या हस्ते चिल्लर बँकेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बालपंचायत अध्यक्ष मानवी सातपुते यांना पहिले बँक पासबुक प्रदान करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष पियुष बुरडे यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व, पैशांचे नियोजन आणि आर्थिक व्यवहारांविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी लहान वयापासून बचतीची सवय लावून आर्थिकदृष्ट्या जागरूक, शिस्तबद्ध आणि जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
चिल्लर बँक हा केवळ पैसे जमा करण्याचा उपक्रम नसून विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन, नियमित बचत, पैशांचे व्यवस्थापन आणि आर्थिक निर्णयक्षमता यांचे प्राथमिक ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून देणारा उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढण्यासोबतच भविष्यात स्वतःच्या आर्थिक गरजा समजून घेऊन योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खापा नगरपरिषद पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा समिती सदस्य, बँक व्यवस्थापक तसेच मॅजिक बस इंडिया फाउंडेशन आणि जे एस डब्ल्यू एस्पायर एज्युकेशन प्रोग्राम च्या संपूर्ण टीमने मोलाचे सहकार्य केले.








