– नांदेडचा संत्रा प्रक्रिया प्रकल्प मोर्शी तालुक्यात स्थलांतरित करा !
– रुपेश वाळके यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी-वरूड हा विदर्भातील संत्रा उत्पादनाचा प्रमुख पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र, याच संत्रा उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांवर आज भीषण दुष्काळ, भूजलपातळीतील घट, वाढता उत्पादन खर्च आणि संत्र्याला मिळत नसलेला योग्य बाजारभाव अशा संकटांचा दुहेरी-तिहेरी मारा होत आहे. कष्टाने पिकविलेल्या संत्र्याला बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांवर संत्रा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येत आहे. संत्रा उत्पादकांचे हे विदारक वास्तव शासनाच्या कृषी धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. संत्रा प्रक्रिया उद्योगांची उभारणी आणि त्यांचा शेतकऱ्यांना होणारा प्रत्यक्ष लाभ याबाबत आता ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागपूर मिहान येथील रामदेवबाबा संत्रा प्रक्रिया प्रकल्प, दापोरी येथील जैन फार्म फ्रेश संत्रा उन्नती प्रकल्प आणि नांदेड येथील संत्रा प्रक्रिया प्रकल्प असूनही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे. या प्रकल्पांचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष किती लाभ मिळतो, किती संत्र्यावर प्रक्रिया होते आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात किती वाढ झाली, याचा शासनाने पारदर्शक आढावा घेऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्शी तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी व्यक्त केली आहे.

संत्रा उत्पादक शेतकरी वर्षभर बागेची निगा राखण्यासाठी मेहनत आणि मोठी आर्थिक गुंतवणूक करतो. मात्र, पीक हातात आल्यानंतर बाजारभाव मिळत नसेल आणि प्रक्रिया उद्योगांचाही आधार मिळत नसेल, तर शेतकऱ्याने जगायचे कसे? संत्रा रस्त्यावर फेकण्याची वेळ येणे ही केवळ एका शेतकऱ्याची समस्या नसून संपूर्ण संत्रा उत्पादक पट्ट्याच्या अर्थव्यवस्थेसमोरील गंभीर संकट आहे. त्यामुळे शासनाने संत्रा प्रक्रिया प्रकल्पांच्या कार्यक्षमतेची तपासणी करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल, अशी व्यवस्था उभी करावी. दुष्काळग्रस्त संत्रा उत्पादकांना तातडीची मदत द्यावी आणि लहान आकाराच्या संत्रावर प्रक्रिया करणारा नांदेड येथील संत्रा प्रक्रिया प्रकल्प मोर्शी तालुक्यात उभारण्याच्या मागणीवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
संत्रा प्रक्रिया प्रकल्पांचा शेतकऱ्यांना फायदा कधी?
संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या मोर्शी-वरूड परिसरात संत्र्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांची मोठी क्षमता आहे. मात्र, बाजारात संत्र्याचे दर घसरले किंवा व्यापाऱ्यांकडून मागणी कमी झाली की उत्पादकांसमोर संत्रा विकायचा कुठे, हा गंभीर प्रश्न उभा राहतो. संत्र्याचा रस, पल्प, कॉन्सन्ट्रेट आणि इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार करणाऱ्या उद्योगांमुळे शेतकऱ्यांना पर्यायी बाजारपेठ मिळू शकते. परंतु प्रक्रिया उद्योगांची उपलब्धता, त्यांची प्रत्यक्ष कार्यक्षमता, खरेदी व्यवस्था आणि शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला यामध्ये प्रभावी समन्वय नसल्यास या प्रकल्पांचा अपेक्षित लाभ उत्पादकांपर्यंत पोहोचणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.
दुष्काळात बागा जगवायच्या की संत्रा फेकून द्यायचा?
यंदाच्या भीषण दुष्काळामुळे मोर्शी-वरूड परिसरातील संत्रा उत्पादकांसमोर बागा जगविण्याचे मोठे आव्हान उभे आहे. पाण्याची पातळी खालावल्याने सिंचनासाठी अडचणी निर्माण होत आहेत. वीज, खते, औषधे आणि मजुरीचा खर्च वाढत असताना संत्र्याला रास्त भाव मिळत नसल्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत, सिंचनासाठी पुरेसे पाणी व वीज आणि संत्र्याच्या विक्रीसाठी प्रभावी व्यवस्था उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असली पाहिजे.
– रुपेश वाळके अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस मोर्शी तालुका.








