spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संजय राऊतांनी रेहान वाड्राच्या चरणी आपला स्वाभिमान अर्पण केला 

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची घणाघाती टीका

सोनिया गांधींचे लुगडे धुण्याची आणि राहुल गांधींची चाकरी करण्याची जबाबदारी असलेल्या जनाब संजय राऊत यांना आता प्रियंका गांधी यांचे पुत्र रेहान वाड्रा यांच्या समर्थनासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागते. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी संजय राऊतांना आपला स्वाभिमान रेहान वाड्राच्या पायाशी अर्पण करावा लागला आहे. इतिहासात एवढी दुर्दैवी वेळ आणि केविलवाणी अवस्था संजय राऊत यांची कधीच झाली नव्हती, असा घणाघाती हल्ला भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेससोबत जाण्यापेक्षा मी माझे दुकान बंद करेन, असे म्हणणाऱ्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा मातीमोल करण्याचे काम जनाब संजय राऊतांनी केल्याचेही बन यांनी नमूद केले.

मनोज जरांगे यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपचा संदर्भ दोन वर्षांपूर्वीचा दिसत असल्याचे सांगून बन म्हणाले, आजकाल एआयच्या जमान्यात अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप बाजारात येतात. त्यामुळे समोर येणारी आणि ऐकायला मिळणारी प्रत्येक गोष्ट सत्य असतेच, यावर विश्वास ठेवता येत नाही. अर्थात, मनोज जरांगे पाटील यांनी ती एआयकडून बनवून घेतली, असे आमचे म्हणणे नाही. त्यांच्यापर्यंत ज्यांनी कोणी ऑडिओ क्लिप दिली, ती एआय जनरेटेड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काल सगळ्यात आधी मी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यांनीही एसआयटीच्या माध्यमातून या चौकशीची मागणी केल्याने या प्रकरणाच्या चौकशीतून सत्य बाहेर यायचे, ते येईल.

500 कोटी रुपयांच्या आरोपाची चौकशी निश्चितपणे झाली पाहिजे. या ऑडिओ क्लिपची सत्यता आधी तपासा. कुठेही एकनाथ शिंदे यांना भाजपाने एक रुपयाही दिला नाही, हे काल स्पष्ट करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांनीही सांगितले की, मला एक रुपयाही मिळालेला नाही. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मी एक रुपयाही दिला नाही. आता एक रुपयाचाही व्यवहार झालेला नसताना त्या ऑडिओ क्लिपमध्ये 500 कोटी रुपयांचा उल्लेख करत जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांची बदनामी केली जाते. मनोज जरांगे पाटील यांचीही बदनामी करण्याचे षडयंत्र या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून रचले जात नाही ना, याचाही तपास घेण्याची गरज आहे. कारण या ऑडिओ क्लिपमधून सर्वाधिक बदनामी मनोज जरांगे यांची होत असल्याचे बन यावेळी म्हणाले.

ऑडिओ क्लिप संजय राऊतांनी जरांगेंना दिली असण्याची शक्यता

या क्लिपमुळे भाजपा, मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे असे तीन पक्षी यामध्ये घायाळ झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. याचा अर्थ स्पष्ट आहे की, ही ऑडिओ क्लिप एकतर संजय राऊत यांनी दिली असेल, महाविकास आघाडीने दिली असेल किंवा एकनाथ शिंदे, भाजपा आणि मनोज जरांगे पाटील यांचे शत्रू असलेल्यांनी दिली असावी. कारण कोणीही स्वतःची बदनामी करून घेणार नाही. त्यामुळे ही ऑडिओ क्लिप कदाचित संजय राऊत यांच्या निकटवर्तीयाने दिली का, याची चौकशी झाली पाहिजे. कारण संजय राऊत यांचे शत्रू हे तिघेही आहेत. त्यामुळे यामागे संजय राऊत यांचा काही हात आहे का, हे तपासले पाहिजे, अशी मागणी  बन यांनी केली.

Popular Articles