spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राळेगाव, कळंबमध्ये विशेष जलसंधारण व जनजागृती मोहीम

– प्रत्येक ग्रामपंचायतीत लोकसहभागातून किमान पाच वनराई बंधारे उभारणार

यवतमाळ :- पाणीटंचाई व संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी राळेगाव व कळंब तालुक्यांत २१ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘विशेष जलसंधारण व जनजागृती सप्ताह’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. भूजल पातळीत होत असलेली घट, पिण्याच्या पाण्याचे संभाव्य दुर्भिक्ष आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नदी, नाले व ओढ्यांवर लोकसहभागातून किमान पाच वनराई बंधारे उभारण्यात येणार आहेत.

पावसाळा संपल्याने स्थानिक नाले व ओढ्यांमधील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळातील पाणीटंचाई व इतर संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी मृद व जलसंधारणाच्या विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच पाणी, चारा व इतर संसाधनांची बचत करून त्यांचा काटकसरीने वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

या सप्ताहाची सुरुवात २१ ऑक्टोबर रोजी मौजा रामतीर्थ, ता. राळेगाव येथे रामगंगा नदीवर वनराई बंधारा उभारून करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे, गटविकास अधिकारी केशव पवार, मंडळ कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत अधिकारी, महसूल सेवक, पोलीस पाटील यांच्यासह गावातील शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते.

मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी १९ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी राळेगाव यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय कार्यालयप्रमुख तसेच महसूल, ग्रामविकास व कृषी विभागातील ग्रामस्तरीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत वनराई बंधाऱ्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. राळेगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान पाच किंवा त्यापेक्षा अधिक वनराई बंधारे लोकसहभागातून उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.

या मोहिमेत सर्व ग्रामपंचायतींतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग नोंदवून वनराई बंधारे उभारण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.

Popular Articles