spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पीडीकेव्ही स्मार्ट मॉडेल व्हिलेज रोडमॅपनुसार गावाचा सर्वांगीण विकास शक्य

–  कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे प्रतिपादन

 – लासिना व यावली येथे क्षेत्रीय भेट आणि मार्गदर्शन

यवतमाळ :- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या ‘पीडीकेव्ही स्मार्ट मॉडेल व्हिलेज’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत शेतीशी संलग्न सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांनी समन्वयाने आणि विद्यापीठाच्या चार सूत्रांनुसार काम केल्यास तीन वर्षांत गावाचा सर्वांगीण विकास साधता येऊ शकतो, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ यांच्या वतीने १७ ऑक्टोबर रोजी लासिना आणि यावली येथे आयोजित क्षेत्रीय भेट व मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.

या उपक्रमात कृषी विज्ञान केंद्राने प्रमुख समन्वयकाची भूमिका बजावून कृषी व संलग्न विभागांच्या सहकार्याने गावाच्या विकासाचे नियोजन करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. गडाख यांनी केले. विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब, उत्पादन खर्चात कपात, शेतमालाचे मूल्यवर्धन आणि शेतीपूरक व्यवसायांचा विस्तार या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी स्मार्ट मॉडेल व्हिलेजच्या चार प्रमुख सूत्रांची माहिती दिली. यामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारातून पीक उत्पादकता वाढविणे, कृषी यांत्रिकीकरणाद्वारे उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादनापासून विपणनापर्यंत मूल्यसाखळी विकसित करून उत्पन्न वाढविणे आणि शेतीला पूरक व्यवसायांची जोड देणे यांचा समावेश आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सर्व विभागांनी व ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. दीपक कच्छवे यांनी उपक्रमाचे उद्देश व महत्त्व स्पष्ट केले. अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय माने यांनी कृषी प्रक्रिया उद्योगांबाबत मार्गदर्शन केले. कृषी विभाग, आत्मा, महाबीज, नाबार्ड, पशुसंवर्धन आणि रेशीम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित शासकीय योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना उपलब्ध संधी समजावून सांगितल्या. लासिना गावच्या सरपंच ज्योतीताई दुधे यांनी गावकरी या उपक्रमाला सहकार्य करतील, असे आश्वासन दिले.

यावेळी मान्यवरांनी लासिना व परिसरातील महिला बचत गटांच्या उपक्रमांना तसेच यावली येथील शेतकरी दिलीप गणेशलाल जयस्वाल यांच्या शेताला भेट देऊन पाहणी केली व चर्चा केली. कार्यक्रमाला विद्यापीठाचे अधिकारी, कृषी विभागाचे कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, महिला बचत गटांच्या सदस्यांसह दोन्ही गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन कृषी अभियांत्रिकी शास्त्रज्ञ राहुल चव्हाण यांनी केले, तर आभार विस्तार शिक्षण विभागाचे शास्त्रज्ञ मयूर ढोले यांनी मानले.

Popular Articles