खापा, वार्ताहर :- पदवीधर नागपूर विभाग मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी खापा येथे उत्साहात मतदान पार पडले. नगर परिषद नेताजी प्राथमिक शाळेतील बूथ क्रमांक १५ वर एकूण ६३.५६ टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळी ८ वाजल्यापासून मतदारांची लगबग सुरू झाली होती. जसजसा दिवस पुढे सरकत गेला, तसतशी मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढत गेली.
खापा येथील या मतदान केंद्रावर एकूण ६४५ मतदारांची नोंद होती. यामध्ये ३९७ पुरुष आणि २४८ महिला मतदारांचा समावेश होता. त्यापैकी ४१० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदार यादीत १०८ दुबार नोंदी असल्याची माहितीही देण्यात आली.

या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार रिंगणात असल्याने मतपत्रिका आकाराने मोठी होती. त्यामुळे मतपत्रिकेची घडी करून ती मतपेटीत टाकताना मतदारांना काहीसा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, नगर परिषद प्रशासनाकडून दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, तसेच सर्व मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
मतदान केंद्रावरील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार अक्षय पोयाम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांनी भेट दिली. यावेळी सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. आशिष देशमुख, विधान परिषद सदस्य डॉ. राजीव पोतदार, नगराध्यक्ष पीयूष बुरडे, उपाध्यक्ष सुनील पाहुणे आणि भाजपचे शहराध्यक्ष जयंत लांजेवार यांनीही मतदान केंद्राला भेट दिली.
याशिवाय पंचायत समिती सावनेरचे माजी सभापती गोविंदा ठाकरे, माजी उपसभापती प्रकाश पराते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश लांजेवार, माजी जिल्हा परिषद सदस्य बैद्यनाथ डोंगरे, युवक काँग्रेसचे सावनेर तालुकाध्यक्ष अंकित मुंगोले आणि खापा शहराध्यक्ष मुकेश पावडे यांनीही केंद्राला भेट दिली.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी खापा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या नेतृत्वाखाली मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाच्या नियोजनामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.








