गडचिरोली :- शिक्षण मंत्रालय, भारत सरकार व विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्राधिकृत संस्था म्हणून सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता (M-SET) ही परीक्षा सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यामार्फत गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड, कन्नावार नगर, गडचिरोली, शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड, गडचिरोली, महिला महाविद्यालय, महसूल कॉलोनी, हनुमान नगर, चंद्रपूर रोड, गडचिरोली, फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, महसूल कॉलनी, हनुमान नगर, चंद्रपूर रोड, गडचिरोली, शिवाजी सायन्स विज्ञान महाविद्यालय, गोकुलनगर, गडचिरोली या परिक्षा केंद्रावर 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 08.00 ते दुपारी 04.00 वाजता या कालावधीत घेण्यात येणार आहे.
परिक्षा केंद्रावरील परिक्षा शांततेच्या वातावरणात पार पडतील व तेथील परिक्षार्थीना तणावमुक्त वातावरणात परिक्षा देणे शक्य होईल अशी व्यवस्था करावी म्हणून सदर परिक्षा केंद्रांच्या परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत भारतीय नागरीक सुरक्षा संहितेचे कलम १६३ अन्वये मनाई हुकुम जारी करणे हे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता आवश्यक झाले आहे.
त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली अविश्यांत पंडा, यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराअंतर्गत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये सदर परिक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टिने सदर परिक्षा केंद्राच्या परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत पुढील बाबी / कृत्ये करण्यास मनाई आदेश जारी केले आहे.
निषिद्ध क्षेत्रात झेरॉक्स मशीन, फॅक्स, व एस टी डी बुथ, परिक्षा कालावधीत सुरु राहणार नाही. परिक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा इत्यादींचा वापर करता येणार नाही. निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, भाषण करणे, घोषणा करता येणार नाही. पाच पेक्षा जास्त इसम एकत्र येणार नाहीत. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर ठेवता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेता येणार नाही. परिक्षा केंद्रापासून 200 मीटर अंतरावर चुन्याची लाईन आखण्यात यावी.
सदर आदेश कर्तव्य बजावणारे वरिष्ठ अधिकारी, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना लागू राहणार नाही. पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांनी परिक्षेच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करून आवश्यक पोलीस बंदोबस्त लावण्याची कार्यवाही व जबाबदारी पार पाडावी. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध फौजदारी नियमांतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. सदर अधिसुचना परिक्षेच्या केंद्रावर 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 06.00 वाजेपासून ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत अमलात राहील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.








