spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात

– शिस्तबद्ध पथसंचलनाने वेधले लक्ष; नागरिकांकडून पुष्पवृष्टीसह उत्स्फूर्त स्वागत

कामठी :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कामठी नगराच्या वतीने आयोजित श्री विजयादशमी उत्सव आणि पथसंचलन रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शिस्तबद्ध पथसंचलन, स्वयंसेवकांची एकजूट, नियुद्ध व दंड संचालनाची प्रात्यक्षिके आणि नागरिकांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

विजयादशमी उत्सवानिमित्त सायंकाळी ६.३० वाजता सुनार ओली, तुमडीपुरा येथील शिक्षक सहकारी माध्यमिक शाळेत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कामठी येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंजू संजय राठी, तर प्रमुख वक्ते म्हणून विदर्भ प्रांताचे सह-गौसेवा गतिविधी प्रमुख रमेशजी मंडाले उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संघप्रार्थनेने झाली. यानंतर नियुद्ध गणाने शारीरिक युद्धकलेची प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली, तर दंड गणाने दंड संचालनाचे कौशल्यपूर्ण प्रदर्शन केले. स्वयंसेवकांनी सामूहिक व्यायामयोगाची प्रात्यक्षिके सादर करून शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि संघभावनेचे दर्शन घडविले.

उत्सवाच्या निमित्ताने सायंकाळी ४.४५ वाजता मोदी पडाव येथील संघ मैदानातून पथसंचलनाला प्रारंभ झाला. स्वयंसेवकांनी शहरातील विविध मार्गांवरून शिस्तबद्ध पद्धतीने संचलन केले. पथसंचलनाच्या स्वागतासाठी मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे स्वागत केले. ‘कौन चले, भाई कौन चले, भारत माँ के लाल चले’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

विजयादशमी हा शक्ती, साहस, संघटन आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा सण आहे. या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक समरसता, सामूहिक शक्तीचे जागरण आणि राष्ट्रीय चेतना दृढ करण्यावर भर देण्यात आला. यावेळी संघाचे विचार, सामाजिक उपक्रम आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये नागरिकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

पथसंचलन आणि विजयादशमी उत्सवाच्या आयोजनामुळे कामठी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शिस्तबद्ध संचलन आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

Popular Articles