– पवनगाव येथील ३० वर्षीय तिलक पाटील यांचा मृतदेह आढळला; अग्निशमन दलाच्या पथकाने राबविली शोधमोहीम
कामठी :- कामठी-पवनगाव मार्गावरील घोरपड शिवारातील कॅनलमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. तिलक शत्रुघ्न पाटील (वय ३०, रा. गजराज सोसायटी, पवनगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास ते कॅनलमध्ये गेल्याची माहिती असून, शोधमोहिमेनंतर त्यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिलक पाटील हे कुटुंबासह पवनगाव येथे वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी ते घरातून बाहेर पडले. त्यानंतर घोरपड शिवारातील कॅनलमध्ये उडी घेतल्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाली.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी नवीन कामठी पोलीस ठाणे आणि त्यांच्या नातेवाइकांना कळविले. नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अक्षय झगडे आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर कामठी नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन विभागाचे अधिकारी अक्षय तिरपुडे तसेच अमित बोरकर, राहुल रंगारी, प्रफुल्ल घरडे आणि मोहम्मद अनस यांनी कॅनलमध्ये शोधमोहीम सुरू केली. कॅनलमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने शोधकार्यात अडचणी येत होत्या. अखेर घटनास्थळापासून सुमारे २०० मीटर अंतरावर खोल पाण्यात तिलक पाटील यांचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. मृतकाचे वडील शत्रुघ्न पाटील यांच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक अक्षय झगडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.








