गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा वाढता धोका आणि वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे नागरिकांसमोर गंभीर संकट उभं राहिलंय आहे. गेल्या 5 ते 10 दिवसांत वाघांच्या हल्ल्यांत 5 नागरिकांचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे, हत्तींच्या कळपांकडून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्यानं शेतकरीही संकटात सापडलेत. त्यातच वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या वनमजुरांचं गेल्या पाच महिन्यांपासून वेतन थकीत आहे. या गंभीर प्रश्नांबाबत काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवारयांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईकयांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत पुढील 7 ते 8 दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नागरिकांची सुरक्षा, शेतपिकांचं संरक्षण आणि वनमजुरांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.
माणसापेक्षा वाघ महत्त्वाचा आहे काय? वाघांना स्थलांतर करा, नाहीतर…
दरम्यान, वाघांच्या हल्ल्याच्या प्रकरणांवर बोट ठेवत त्यांनी वनविभाग आणि सरकारच्या कार्यप्रणालीवर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, यापूर्वी सावली तालुक्यात एक वाघ पकडला गेला. वाघाची संख्या प्रचंड झाली आहे. माणसापेक्षा वाघ महत्त्वाचा आहे काय? वाघांना स्थलांतर करा, नाहीतर आम्हाला नरभक्षी वाघाला वाटेल त्या-त्या प्रकाराचा वापर करून आमच्या संरक्षणासाठी संपवावा लागेल. असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. निसर्गाच्या संरक्षणासाठी आम्ही ठेका घेतला नाही. सरकार जंगल संपवत आहे. परिणामी आम्हाला वन विभाग विरुद्ध मोठं आंदोलन करावं लागेल त्याची तयारी आम्ही करत असल्याचे ही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
तीन जणांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद, पहिल्यांदाच वाघ पकडण्यासाठीचा अभिनव प्रयोग
चंद्रपूर जिल्ह्यातील टी-122 या नर वाघाला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. वनविभागाने तयार केलेल्या विशेष 30 बाय 30 फुटाच्या महाकाय पिंजऱ्यात हा वाघ अडकला असून चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात पहिल्यांदाच वाघ पकडण्यासाठी एक अभिनव प्रयोग चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आला होता. या प्रयोगामध्ये टी-122 या नर वाघाला पकडण्यासाठी 30 बाय 30 फूट म्हणजेच 900 वर्ग फुटाचा एक अतिशय मोठा पिंजरा तयार करण्यात आला होता. सावली तालुक्यातील सामदा या भागात या वाघाने गेल्या काही दिवसात तीन जणांचा बळी घेतला तर एकाला जखमी केले होते. मात्र डार्ट मारून वाघ पकडण्याची पारंपारिक पद्धत या वाघासाठी कुचकामी ठरल्याने या वाघाला जेरबंद करण्यासाठी पूर्णपणे नो मॅन्स लॅण्ड तयार करून जेरबंद करण्यासाठी हा विशाल पिंजरा तयार करण्यात आला होता आणि संपूर्ण राज्यात पहिल्यांदाच वापरण्यात आलेल्या या पद्धतीने वाघ पकडण्यात यश आला आहे.








