चंद्रपूर :- मसाल्यांच्या खमंग सुगंधामागे भेसळीचा घातक खेळ सुरु असल्याच्या तक्रारींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरातील सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. हळद, मिरची, धने, जिरे ते गरम मसाल्यापर्यंत आता प्रत्येक मसाला सीलबंद पॅकिंगमध्येच विकावा लागणार आहे. उत्पादनस्थळीच पॅकिंग व सीलिंग बंधनकारक असून, मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग, विषारी रसायने, विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुसा मिसळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.कारवाईचा फास केवळ किरकोळ विक्रेत्यांपुरता मर्यादित न राहता उत्पादक, दळण केंद्रे, घाऊक विक्रेते, वाहतूकदार आणि हॉटेल व्यावसायिकांपर्यंत पोहोचणार आहे. ग्रामीण आठवडी बाजारांपासून शहरातील किराणा दुकानांपर्यंत सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे मसाल्यांच्या खरेदी विक्रीचे चित्र बदलणार आहे.
मसाल्यात कोणकोणत्या उत्पादनांचा समावेश?
हळद, लाल मिरची, धने, जिरे, काळी व पांढरी मिरी, सुंठ, वेलदोडे, लवंग, दालचिनी, जायफळ, जायपत्री, मेथी, मोहरी, ओवा, बडीशेप, शहाजिरे, तमालपत्र, हिंग, केशर, लसूण पूड, कांदा पूड, आमचूर, करी पावडर आणि विविध मिश्र मसाले यांचा नियमांच्या कक्षेत समावेश होतो.
उत्पादनस्थळीच पॅकिंग सक्ती
मसाल्यांची पूड आणि मिश्र मसाले सुट्या स्वरूपात किंवा विनापॅकिंग विकता येणार नाहीत. उत्पादन किंवा प्रक्रिया करणाऱ्या ठिकाणीच मसाले योग्य पद्धतीने पॅक करून सीलबंद करणे आवश्यक आहे. पाकिटावर घटकांची माहिती, उत्पादकाचे नाव-पत्ता, परवाना, बेंच क्रमांक, उत्पादन, वापराच्या मुदतीचा तपशील नमूद करावा लागेल.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ मिळावेत, हा या निर्णयामागील उद्देश आहे. मसाल्यांचे उत्पादन, प्रक्रिया, पॅकिंग, वाहतूक व विक्री या प्रत्येक टप्प्यावर अन्नसुरक्षा नियमांचे पालन आवश्यक आहे. सुट्या मसाल्यांची विक्री, अनधिकृत रंगांचा वापर किंवा अन्य प्रकारची भेसळ आढळल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील मसाला उत्पादक, विक्रेते, किराणा दुकानदार तसेच हॉटेल व्यावसायिकांनी लागू असलेल्या नियमांचे पालन करावे.
– प्रवीण उमप, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर








