spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तोतलाडोहमधील घटत्या साठ्यामुळे दिवाळीनंतर १० टक्के पाणीकपात

नागपूर :-  उपराजधानीची तहान भागवणाऱ्या तोतलाडोह प्रकल्पात यंदा केवळ ३७.८४ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिल्याने नागपूरकरांवर भीषण पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. २०१८ मधील बिकट परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे असून, मे-जून २०२७ मधील संभाव्य जलसंकट विचारात घेता दिवाळी सण संपताच शहराच्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्याच्या पर्यायावर महानगरपालिका गांभीर्याने विचार करत आहे.

पाणीपुरवठ्यावर कडक निर्बंध लादले जाण्याची दाट शक्यता

ऑक्टोबर २०१८ मध्ये तोतलाडोहमध्ये ४५ टक्के साठा होता. परिणामी, २०१९ च्या जून-जुलै महिन्यात उपयुक्त जलसाठा ‘शून्यावर’ आला होता. त्यावेळी शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदा २५ ऑक्टोबर रोजी तोतलाडोहमधील जलसाठा अवघा३७.८४टक्क्यांवर(गेल्या वर्षी ७३.९३ टक्के), तर नवेगाव खैरी प्रकल्पातील जलसाठा ६१.१३ टक्क्यांवर (गेल्या वर्षी ९५.७८ टक्के) घसरला आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात २०१९ पेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून, दिवाळीनंतर शहरात पाणीपुरवठ्यावर कडक निर्बंध लादले जाण्याची दाट शक्यता जलप्रदाय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पाणीपुरवठ्याच्या तासांत होणार कपात

मनपा सध्या तोतलाडोह आणि कन्हान नदीतून शहराला दररोज सुमारे ७४० दशलक्ष लिटर (एमएलडी) शुद्ध पाण्याचा पुरवठा करते. शासनाच्या निर्देशानुसार १० टक्के कपात लागू झाल्यास दररोज ७४ दशलक्ष लिटर पाणी कमी मिळेल. सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळामुळे मनपाने ही कपात तूर्तास लांबणीवर टाकली आहे. मात्र, थेट पाणीपुरवठा बंद करण्याऐवजी दररोजच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत (तासांमध्ये) कपात करून पाण्याचे नियोजन करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे.

गळती व चोरी रोखण्याचे आव्हान

राज्य शासनाने पाणीवापर १० टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश दिले असले, तरी मनपा सध्या पाणीगळती रोखणे, अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करणे आणि पाण्याचा अपव्यय थांबवण्यावर भर देत आहे. शहराला होणाऱ्या एकूण पुरवठ्यापैकी सुमारे २५९ एमएलडी म्हणजेच तब्बल ३५ टक्के पाणी ‘नॉन-रेव्हेन्यू वॉटर’ (गळती व चोरी) म्हणून वाया जाते. त्यामुळे हे नुकसान रोखणे हे मनपासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरत आहे.

Popular Articles