spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भरधाव ट्रॅक्टरची मोपेडला भीषण धडक; महिलेचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

– परसवाडा नाल्याजवळ घडली दुर्घटना; अज्ञात ट्रॅक्टर चालकावर सिहोरा पोलिसांत गुन्हा दाखल

हंसराज,भंडारा सिहोरा :- येथील सिहोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परसवाडा (सि.) नाल्यासमोरील सिमेंटरस्त्याच्या वळणावर एका भरधाव ट्रॅक्टरने मोपेडला जोरदार धडक दिली. मंगळवारी (२७ऑक्टोबर) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात एका ४५ वर्षीयमहिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. याघटनेनंतर अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तारा कपूरचंद सातके (वय ४५, रा. रेंगेपार) असे मृत महिलेचे नाव असून, सुमीत राजेश गुप्ता (वय १६) हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारा सातके आणि सुमीत गुप्ता हे दोघे मंगळवार रात्री मोपेडने (क्रमांक एमएच ३५ डीडी १९६९) सिलेगाव येथून परसवाडा गावाकडे जात होते. दरम्यान, परसवाडा नाल्यासमोरील वळणावर सिलेगावच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. सदर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये तणस (पेंढा) भरलेले होते. ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजी वाहन चालविण्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अपघात इतका भीषण होता की, मोपेडवरील दोघेही रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले.घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांनाही तातडीने सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या तारा सातके यांची प्राणज्योत मालवली. जखमी सुमीत गुप्ता याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रेंगेपार (पांजरा) परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी सिहोरा पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५(ब), १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार विजय कसोधन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरिदास सुरपाम पुढील तपास करीत आहेत. अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या ट्रॅक्टरचा व चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Popular Articles