spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गावकारभाराला मिळणार हक्काचे छत!

– भंडारा जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींच्या इमारतींसाठी १ कोटी ५ लाखांची मंजुरी

– मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून निधी; एका वर्षात बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन

हंसराज,भंडारा :- ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना हक्काची प्रशासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींच्या कार्यालयीन इमारतींच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी एकूण १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी अनुज्ञेय करण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

मंजुरी मिळालेल्या ग्रामपंचायतींमध्ये खडकी, काटे बाम्हणी, बोरगाव, देवसर्रा आणि ककापूर यांचा समावेश आहे. खडकीसाठी २५ लाख रुपये, तर उर्वरित चार ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. शासन निर्णयातील माहितीनुसार, मोहाडी व तुमसर तालुक्यांतील ग्रामपंचायतींचा या योजनेत समावेश आहे.

बांधकामासाठी ग्रामसभेचा ठराव, जागेची उपलब्धता आणि जिल्हा परिषदेची अंतिम मंजुरी आवश्यक राहणार आहे. इमारतींचे बांधकाम पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला असून, नैसर्गिक प्रकाश, वायुवीजन, पाणी व ऊर्जेची बचत आणि पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण यांचा समावेश बंधनकारक आहे. काम सुरू झाल्यानंतर एका वर्षात बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन असून, प्रगतीचा त्रैमासिक अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे.

Popular Articles