spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा फिल्मी स्टाईलने पाठलाग!

– ड्रॅगन पॅलेसजवळ भरधाव कार मेट्रोच्या सुरक्षा कठड्याला धडकून पलटी; नागपूर गुन्हे शाखेची कारवाई

कामठी :- अंमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत (एनडीपीएस) दाखल गुन्ह्यात अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पाहिजे आरोपीला पकडण्यासाठी नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने गुरुवारी पहाटे धडक कारवाई केली. कन्हानहून कामठीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाला पोलिसांची चाहूल लागताच त्याने वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग सुरू केल्यानंतर ड्रॅगन पॅलेसजवळील भुयारी पुल परिसरात कार मेट्रोच्या सुरक्षा कठड्याला जोरदार धडकून पलटी झाली. या थरारक घटनेत सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. पोलिसांनी याप्रकरणी पाहिजे आरोपी मोहम्मद शारीक मोहम्मद राजीक (वय ३३, रा. पिली नदी परिसर, नागपूर) याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल एका गुन्ह्यातील संबंधित आरोपी मागील काही महिन्यांपासून पोलिसांच्या अटकेपासून दूर होता. त्याचा शोध सुरू असतानाच तो कन्हानहून कामठीकडे येत असल्याची गोपनीय माहिती नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. या माहितीची दखल घेत पथकाने गुरुवारी पहाटे सुमारे पाच वाजताच्या सुमारास ड्रॅगन पॅलेसजवळील भुयारी पुल परिसरात सापळा रचला.

काही वेळातच कन्हानच्या दिशेने कामठीकडे भरधाव वेगाने येणारी चारचाकी पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांची उपस्थिती लक्षात येताच वाहनचालकाने कारचा वेग वाढवून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारचा पाठलाग सुरू केला.

पोलिसांचा पाठलाग सुरू असतानाच भरधाव कार ड्रॅगन पॅलेसजवळील भुयारी पुल परिसरात मेट्रोच्या सुरक्षा कठड्याला जोरदार धडकली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारने पलटी मारली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

अपघाताच्या वेळी कारमध्ये तीन जण प्रवास करीत असल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करीत एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मोहम्मद शारीक मोहम्मद राजीक याला ताब्यात घेऊन अटक केली.

अंमली पदार्थविरोधी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केलेली ही कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक भरत क्षीरसागर ,पोलीस निरीक्षक महेश आंधळे व सहकारी पथकाने केली.

Popular Articles