– जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तोंडली येथे आनंददायी शनिवार अंतर्गत शिवणकलेचा अभिनव उपक्रम
किशोर साहू :- विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत त्यांच्यामध्ये स्वावलंबन, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तोंडली येथे आनंददायी शनिवार अंतर्गत टाकाऊ कापडापासून कापडी पिशव्या तयार करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः सुई-दोऱ्याच्या साहाय्याने सुंदर कापडी पिशव्या शिवून आपल्या कलाकौशल्याची प्रचिती दिली.
शिवणकलेची सुरुवात होते ती सुईत दोरा ओवण्यापासून! सुईमध्ये दोरा ओवणे, कापड व्यवस्थित पकडणे, एकाग्रतेने शिलाई करणे आणि सरळ रेषेत टाके घालत पिशवीला सुबक आकार देणे, या प्रत्येक टप्प्यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सुईत दोरा ओवण्यापासून ते कापडाच्या तुकड्यांना टाक्यांनी जोडण्यापर्यंत विद्यार्थ्यांनी संयम, एकाग्रता आणि चिकाटीचा अनुभव घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर व सरळ रेषेत शिलाई करून आकर्षक कापडी पिशव्या तयार केल्या.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे टाकाऊ कापडाचा पुनर्वापर करून उपयुक्त वस्तू तयार करण्याची संकल्पना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून अनुभवली. बाजारातून किराणा माल आणताना, भाजीपाला खरेदी करताना तसेच दैनंदिन जीवनातील विविध कामांसाठी प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करता येतो, हे विद्यार्थ्यांना समजले. टाकाऊतून टिकाऊ आणि कृतीतून पर्यावरण संवर्धन हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये हातांचे सूक्ष्म कौशल्य, एकाग्रता, संयम, अचूकता, सर्जनशीलता आणि स्वावलंबन विकसित होण्यास मदत झाली. तसेच पुनर्वापराचे महत्त्व, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन यांविषयी जागरूकता निर्माण झाली. केवळ पुस्तकातून पर्यावरण संवर्धनाचे धडे न देता प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणपूरक सवयी रुजविण्याचा स्तुत्य प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
प्लास्टिकमुक्त परिसर निर्माण करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याचा निर्धारही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाच्या वेळी सहशिक्षक निलेश जाधव उपस्थित होते.अशा प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तोंडली येथे राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना शिवणकलेची प्राथमिक ओळख करून देणारा, स्वावलंबनाचे धडे देणारा आणि पर्यावरण संवर्धनासाठी कृतीशील बनविणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.








