– देवलापार वनपरिक्षेत्रांतर्गत बांद्रा गावा जवळील घटना
सचिन चौरसिया, रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर बांद्रा जवळील उड्डाणपुलाच्या परिसरात भीषण अपघातात एका बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार (दि.३०) रोजी रात्री सुमारे १० ते १०:३० वाजताच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार उड्डाणपुलाच्या जवळून रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्याच्या जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच देवलापार प्रादेशिक वनक्षेत्राचे वन अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहोचले. पंचनामा तयार करून बिबट्याचे शव शवविच्छेदनासाठी नागपूर टीटीसी येथे पाठवण्यात आले. शनिवारी (दि.३१) ला नागपूरच्या उपवनसंरक्षक डॉ. विनिता व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली, जी.एफ.लुचे, रामटेक, एस.बी. टुले , देवलापार प्रादेशिक वन अधिकारी श्रीनिवासन लोंढे, मानद वन्यजीव संरक्षक अजिंक्य भाटकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोलणकर, डॉ. वीरेंद्र सोनकुसरे आणि डॉ. प्रियल चौरगडे यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर, कायदेशीर पंचनामा पूर्ण करून बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील कार्यवाही नागपूर (प्रादेशिक) उपवनसंरक्षक आणि रामटेक येथील सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ एस. बी. टुले यांच्यामार्फत हाताळली जात आहे.








