spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

इटियाडोहच्या पाण्याने ५,०५० हेक्टर शेती फुलणार

– किती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ?

गोंदिया :- तालुक्यात यावेळी चांगलीच पर्जन्यवृष्टी झाली. इटियाडोह जलाशय १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाला होता. तर दुसरीकडे एल-निनोच्या प्रभावाने राज्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता यावेळी उन्हाळी हंगाम भात पिकासाठी पाणी सोडले जाणार की नाही अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. जलाशयाच्या क्षेत्रात तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश होतो. जलाशयातील पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी पाणी वापर संस्थांकडे आहे. उन्हाळी हंगाम संबंधाने निर्णय घेण्यासाठी बुधवारी प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेची बैठक स्थानिक कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष पालीवाल यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. त्यामध्ये उन्हाळी हंगाम २०२६-२७ मध्ये तिन्ही जिल्ह्यातील ५,०५० हेक्टर क्षेत्रात जलसिंचनासाठी जलाशयातून पाणी सोडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

इटियाडोह जलाशयाच्या क्षेत्रात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा व आरमोरी तालुक्यातील शेत शिवाराचा समावेश आहे. जलाशयातील पाण्याचे नियोजन तसेच शेतसारा जमा करण्याची जबाबदारी पाणी वापर संस्थेची असते. यात लाखांदूर तालुक्यात १४, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २१ तर वडसा व आरमोरी तालुक्यात २० पाणी वापर संस्था कार्यरत आहेत.

९३.७४ दलघमी पाणी उन्हाळी भात पिकासाठी

आजघडीला जलाशयात ९०.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. शासनाच्या निर्देशानुसार संभाव्य पाणी टंचाई आरक्षण वजा जाता ९३.७४ दलघमी पाणी उन्हाळी भात पिकासाठी उपलब्ध होणार आहे. यात आरमोरी व वडसा तालुक्यातील २,०२० हेक्टर तसेच लाखांदूर व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३,०३० हेक्टर क्षेत्रातील भात पिकाला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सहजरित्या पाणीपुरवठा होऊन पाण्याचा अपव्यय होणार नाही. टोकावरील क्षेत्र वगळण्यात यावे. तसेच ज्या संस्थेकडे पानसारा थकीत आहे, त्यांना उन्हाळी हंगाम भात पिकासाठी पाणीपुरवठा करण्यात येऊ नये असे बैठकीत ठरले. उन्हाळी हंगामासाठी जलाशयाचे पाणी सोडण्यावर शिक्कामोर्तब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे.

Popular Articles