spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शेकोटीतील जळत्या लाकडाने वडीलांना संपविले!

गडचिरोली :- अंगणात शेकोटीभोवती जेवण करताना पिता-पुत्रातील वाद विकोपाला गेला. यात पैशाच्या वादातून मद्यधुंद मुलाने जन्मदात्या वडिलांवर पेटत्या लाकडाने हल्ला करुन त्यांचा निर्घृण खून केला. अत्यंत संतापजनक व थरकाप उडवणारी ही घटना कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी येथील बिरसा नगर येथे घडली. बुधवारी, २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली.

पैशाच्या कारणावरून शाब्दिक वाद

मनोहर निरंगशहा गोटा (५१, रा. चारभट्टी बिरसा नगर) असे मृत वडिलांचे तर, नागेश मनोहर गोटा (२९) असे आरोपी मुलाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी अवकाळी रिमझिम पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे गोटा कुटुंबातील सर्व मंडळी घराच्या अंगणात शेकोटी पेटवून जेवणासाठी बसले होते. जेवण सुरू असतानाच वडील मनोहर व मुलगा नागेश यांच्यात पैशाच्या कारणावरून शाब्दिक वाद सुरू झाला.

वडिलांच्या डोक्यावर जोरदार प्रहार

या दरम्यान आरोपी नागेश हा दारूच्या नशेत असल्याने वाद अधिकच विकोपाला गेला. रागाच्या भरात त्याचे नियंत्रण सुटले व त्याने शेकोटीतीलच एक जळते लाकू उचलून थेट वडिलांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या भीषण हल्ल्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मनोहर गोटा यांचा जागीच मृत्यू झाला.

आरोपीला ठोकल्या बेड्या

घटनेची माहिती मिळताच पुराडा ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुरखेडा ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी आरोपी नागेश गोटा याला ताब्यात घेतले आहे.

Popular Articles