– टेकडी गणेश मंदिर व श्री गणेश गोशाळेच्या वतीने आयोजन; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
नागपूर :- दीपावली पर्वातील पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोवत्स बारस अर्थात वसुबारस निमित्त गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील श्री गणेश गोशाळा, मोहगाव झिल्पी येथे गोपूजनाचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री गणेश मंदिर टेकडी, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली संचालित श्री गणेश गोशाळेत सकाळी ११ वाजता. हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून गोमातेचे पूजन करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतीय संस्कृतीत गोमातेला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. गोवत्स बारस हा दिवस गायी आणि वासरांच्या पूजनासाठी समर्पित असून, या दिवशी गोमातेची पूजा करून कुटुंबाच्या सुख- समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. दिवाळीच्या मंगलमय पर्वाची सुरुवात वसुबारस पासून होत असल्याने या सणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, पशुधनाचे महत्त्व जाणून घेणे आणि भारतीय संस्कृतीतील गोसेवेची परंपरा जपणे, हा या सणामागील प्रमुख उद्देश आहे.
गोसेवा आणि गोपूजनाचा धार्मिक सोहळा
श्री गणेश गोशाळा, मोहगाव झिल्पी, ता. हिंगणा, जि. नागपूर येथे आयोजित या कार्यक्रमात गोमातेचे पूजन करण्यात येणार आहे. भक्तिभावाने साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्याच्या माध्यमातून गोसेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गोमातेचे संरक्षण, संवर्धन आणि संगोपन यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक जाणीव जागृत करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे.
कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे ११ वाजतापासून आपल्या आगमनापर्यंत आयोजन
गोवत्स बारस पूजन सोहळ्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील भाविक, नागरिक आणि गोभक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहून गोपूजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दरम्यान, टेकडी गणेश मंदिर, सीताबर्डी, नागपूर येथील ‘ दि अँडव्हासरी सोसायटी ऑफ गणेश मंदिर’ टेकडी’च्या वतीनेही या निमित्ताने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सोसायटीच्या आजीव सदस्यांसाठी सकाळी ९ वाजता मंदिरात बस ची सोय करण्यात आल्याची माहिती निमंत्रण पत्रिकेत देण्यात आली आहे.दीपावलीच्या प्रारंभी गोमातेचे पूजन करून सुख, समृद्धी आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करण्याची परंपरा जपत यंदाही गोवत्स बारस उत्साहात साजरी करण्याची तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून गोसेवेची भावना अधिक दृढ व्हावी आणि नव्या पिढीपर्यंत भारतीय सण- उत्सवांचे सांस्कृतिक महत्त्व पोहोचावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








