spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी- कृष्णाजी ठाकरे

– राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यवतमाळ नगराच्या विद्यार्थी विभागाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

यवतमाळ :- स्थानिक विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यवतमाळ नगराच्या विद्यार्थी विभागाचा विजयादशमी उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी स्वयंसेवकांनी परिसरातून शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलन केले. या पथसंचलनादरम्यान परिसरातील नागरिकांनी बाल स्वयंसेवकांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

त्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात स्वयंसेवकांनी सामूहिक समता, नियुद्ध, दंड, सांघिक व्यायामयोग, सांघिक गीत आणि घोष यांची आकर्षक प्रात्यक्षिके सादर केले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उबंटूच्या प्राचार्य शुभांगी बोरखेडे उपस्थित होत्या. नगर संघचालक धनंजय पाचघरे यांनी त्यांचे रोपटे देऊन स्वागत केले. आपल्या मनोगतात शुभांगी बोरखेडे यांनी समाजजीवनातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्व विशद केले. संघाच्या संस्कारातून घडणारा स्वयंसेवक जीवनात निश्चितच यशस्वी होतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विदर्भ प्रांत धर्मजागरण प्रमुख कृष्णजी ठाकरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विजयादशमीचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले. असुरी शक्तींवर सज्जनशक्तीने मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून विजयादशमी साजरी केली जाते, असे सांगत त्यांनी भारतीय संस्कृती, परंपरा आणि छत्रपती राजे-महाराजांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांतून विद्यार्थ्यांनी कोणते गुण आत्मसात करावेत, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी संघाच्या पंचपरिवर्तनातील महत्त्वपूर्ण विषयांवरही प्रकाश टाकला. सामाजिक समरसतेच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना सोबत घेऊन चालणे, कुटुंब प्रबोधनातून कुटुंबातील सदस्यांनी एकत्रित भोजन व भजन करणे, पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजहितासाठी सजग राहून नागरिक कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात मुकुंद वाघमारे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. शिवम लोखंडे यांनी सुभाषित, राजवीर चौधरी यांनी अमृतवचन, श्रीपाद देशपांडे यांनी वैयक्तिक गीत, तर श्रीपाद बापट यांनी प्रार्थना सादर केली निशांत रेाऊ यांनी मुख्य शिक्षक म्हणून जबाबदारी पूर्ण केली.

या कार्यक्रमाला नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles