spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाज्योतीच्या प्रायोजित उपक्रमातून अंकिता गोसावी यांचे व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण पूर्ण

– विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते सन्मान

नागपूर :- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्या प्रायोजित वैमानिक प्रशिक्षण उपक्रमांतर्गत नागपूर उड्डाण क्लब येथे प्रशिक्षण घेतलेल्या शिरपूर (जि. धुळे) येथील अंकिता गोसावी यांनी कमर्शियल पायलट लायसन्स प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल नागपूर येथे आयोजित समारंभात एपॉलेट्स प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

महाज्योतीमार्फत प्रायोजित वैमानिक प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात नोव्हेंबर २०२२ मध्ये नागपूर उड्डाण क्लब येथे झाली. या उपक्रमात प्रशिक्षणार्थींना प्रारंभी ग्राउंड क्लासेस तसेच प्रत्यक्ष विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात येते. अंकिता गोसावी यांनी नागपूर उड्डाण क्लब येथे राहून व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.

या प्रशिक्षणादरम्यान अंकिता गोसावी यांनी नागपूर उड्डाण क्लब येथे सिंगल इंजिन विमानावर सुमारे १८५ तासांचे उड्डाण प्रशिक्षण पूर्ण केले. जुलै २०२६ मध्ये हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उर्वरित १५ तासांचे मल्टी इंजिन विमानावरील उड्डाण प्रशिक्षण त्यांनी तेलंगणा स्टेट एव्हिएशन अकॅडमी, हैदराबाद येथे पूर्ण केले. आवश्यक उड्डाण प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणातील महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केला.

या उल्लेखनीय यशाबद्दल २ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे आयोजित समारंभात अंकिता गोसावी यांना एपॉलेट्स लावून सन्मानित करण्यात आले. नागपूर उड्डाण क्लबच्या अध्यक्षा तथा विभागीय आयुक्त, नागपूर विभाग विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी नागपूर उड्डाण क्लबचे व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) तुषार मठकर यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच महाज्योतीचे अधिकारी उपस्थित होते.

नागपूर उड्डाण क्लब हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून, वैमानिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या प्रशिक्षणार्थींना व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात या संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. महाज्योतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे वैमानिक क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या प्रशिक्षणार्थींना आवश्यक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे. अंकिता गोसावी यांनी सातत्य, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मिळविलेले हे यश वैमानिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Popular Articles