– महापौर यांच्या हस्ते ‘महापौर चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे’ थाटात उद्घाटन
नागपूर :- महिला खेळाडूंमधील सुप्त क्रीडागुणांना योग्य वाव मिळवून देण्यासह त्यांना उच्च स्तरावर खेळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वपूर्ण उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ‘महापौर चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे’ अत्यंत दिमाखदार सोहळ्यात आयोजन करण्यात आले आहे. महापौर निता ठाकरे यांच्या विशेष पुढाकारातून सुरू झालेली ही स्पर्धा शहरातील यशवंत स्टेडियम येथे ८ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, नगरसेविका वैशाली उदापूरकर, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, उद्घाटना प्रसंगी खेळांडूकरिता अत्यंत उत्साहवर्धक आणि लक्षवेधी प्रसंग पाहायला मिळाला.
उद्घाटनानंतर महापौर निता ठाकरे यांनी केवळ विधिवत पूजा करून औपचारिकता न पाळता, थेट मैदानावर उतरत बॅट हातात घेतली. उपस्थित इतर पदाधिकारी आणि खेळाडूंच्या साक्षीने त्यांनी क्रिकेटच्या खेळपट्टीवर चेंडूवर दणदणीत फटकेबाजी केली. त्यांच्यासह स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड यांनी देखील गोलंदाजी व फलंदाजीचा आनंद घेतला. सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी देखील जोरदार फटकेबाजी केली. महापौर आणि इतर पदाधिकार्यांच्या या उत्साही आणि खेळाडू वृत्तीच्या अंदाजाने संपूर्ण स्टेडियममधील महिला खेळाडू आणि प्रेक्षकांची मने जिंकली, आणि टाळ्यांच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यानंतर महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांनी काही वेळ क्रिकेटच्या या रोमहर्षक सामन्याचा मनसोक्त आनंद घेतला. 

महापौर यांच्या हस्ते सामनावीर आरजू तिम्मा हिला पारितोषिक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत शहरातील ८ नामांकित महिला क्रिकेट संघांमधील एकूण १२० खेळाडू सहभागी नोंदविला आहे. सहभागी संघांची अ आणि ब अशा दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. विजेता संघास जेतेपदाचा चषक व १ लक्ष रुपयांचे पारितोषिक उपविजेता संघास ५१ हजार रुपयांचे पारितोषिक तसेच या स्पर्धेतील व्यक्तिगत कामगिरीसाठी सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यात सामनावीर खेळाडूस सन्मानचिन्ह व रुपये २१००, मालिकावीर खेळाडूस सन्मानचिन्ह व रुपये २१,००, उत्कृष्ट फलंदाज खेळाडूस सन्मानचिन्ह व रुपये २१,००, उत्कृष्ट गोलंदाज खेळाडूस सन्मानचिन्ह व रुपये २१,०० अशा प्रकारे खेळाडूंना पुरस्कृत करण्यात येणार आहे.








