spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

साडेतीन लाखांत नवजात बाळाचा सौदा

– २४ दिवसांपासून फरार भोजने दाम्पत्य अटकेत

अमरावती :- अल्पवयीन मुलीची कथितरीत्या बेकायदेशीर प्रसूती करून तिच्या नवजात बाळाची साडेतीन लाख रुपयांत विक्री करण्याचा सौदा केल्याच्या गंभीर प्रकरणात २४ दिवसांपासून फरार असलेल्या भोजने दाम्पत्याला अखेर पोलिसांनी अटक केली. फ्रेजरपुरा पोलिसांनी बुधवारी रात्री साईनगर-अकोली परिसरातून ही कारवाई केली. डॉ. वैशाली प्रफुल्ल भोजने (४९) आणि प्रफुल्ल वसंतराव भोजने (५६, दोघेही रा. बुटी प्लॉट, राजापेठ, अमरावती; मूळ रा. हिवरखेड, ता. मोर्शी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मानवी तस्करी आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा

या प्रकरणी १८ ऑक्टोबर रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात मानवी तस्करी आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता. साडेसतरा वर्षीय अल्पवयीन मुलीची कथितरीत्या बेकायदेशीर प्रसूती करण्यात आली होती. त्यानंतर नवजात बाळाच्या विक्रीसाठी साडेतीन लाख रुपयांचा सौदा ठरल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या साडेसोळा वर्षीय प्रियकरासह डॉ. वैशाली भोजने, त्यांचे पती प्रफुल्ल भोजने आणि अन्य संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. अल्पवयीन मुलाच्या ताब्यात घेतल्यानंतर त्याला बालगृहात पाठविण्यात आले होते, तर अन्य एका सहआरोपी डॉक्टरला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, भोजने दाम्पत्य गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते.

साईनगर परिसरात पोलिसांचा सापळा

भोजने दाम्पत्य साईनगर-अकोली परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने परिसरात सापळा रचला. संशयितांची खातरजमा केल्यानंतर ते भोजने दाम्पत्य असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तत्काळ दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आणि अटक केली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला आणि पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे, गुन्हे शोध पथकातील कर्मचारी आणि महिला पोलीस अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Popular Articles