नागपूर :- भारताचे पहिले पंतप्रधान व स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि बालदिन जवाहर विद्यार्थी गृह, नागपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांविषयी विशेष प्रेम होते. त्यामुळे त्यांची जयंती देशभरात बालदिन म्हणून साजरी केली जाते. या निमित्ताने जवाहर विद्यार्थी गृहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र दिवटे यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे मुख्यकार्यवाह हर्षवर्धन बेले, रमेश पिसे, लोकनाथ भुरे, महेश झोरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारीवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बालदिन हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे. मुलांमध्ये शिक्षण, संस्कार, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविणे आवश्यक असल्याचा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाच्या माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचे स्मरण करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देण्यात आली.






