– एक पिस्टल व दोन जिवंत काडतूस मॅगझीनसह जप्त
गोंदिया :- कमरेला पिस्टल खोचून संशयास्पदरित्या फिरत असलेल्या युवकाला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून एक पिस्टल व मॅनझिनसह दोन जिवंत काडतूस जप्त केले आहे. शहर पोलिस ठाण्यांतर्गत लक्ष्मीनगर गौतम बुद्ध वॉर्डात सोमवारी, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
गुप्त माहितीद्वारे कारवाई
शहरातील लक्ष्मीनगर गौतम बुद्ध वॉर्ड परिसरात एक युवक पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना युवक सुशील कळबे यांच्या दुकानासमोर संशयास्पद स्थितीत वावरताना दिसला. यावर पथकाने त्याला नाव-पत्ता विचारले असता त्याने नागसेन बोधीमन्तो (४४, रा. गौतम बुद्ध वार्ड, श्रीनगर) असे नाव सांगितले.
युवकाला घेतले ताब्यात
पथकाने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला मागील बाजूस शर्टच्या आत एक पिस्टल व दोन जिवंत काडतूस मॅगझीनसह मिळून आले. पथकाने पिस्टल व काडतूस जप्त केले असून युवकाला ताब्यात घेतले. प्रकरणी फिर्यादी सहायक फौजदार कवलपालसिंग भाटिया यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तपास सपोनि. वैभव गेडाम करीत आहेत.






