spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोरमेट्टातील अंधार अखेर दूर, पोलिसांमुळे तीन वर्षांनंतर वीजपुरवठा सुरळीत

– कठीण भौगोलिक स्थिती

गडचिरोली :- अतिशय दुर्गम व आदिवासी बहुल भामरागड उपविभागातील मोरमेट्टा गावातील अंधार अखेर दूर झाला आहे. जिल्हा पोलिस दल व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (महावितरण) यांच्या संयुक्त प्रयत्नातून तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या गावात १६ नोव्हेंबर रोजी विद्युत सेवा सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहे.

नेलगुंडा येथे पोलिस दलाच्या वतीने ३० जानेवारी २०२५ रोजी नवीन पोलिस स्टेशनची स्थापना करण्यात आली . त्यानंतर या परिसरातील विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. हद्दीतील मोरमेट्टा गावात वीज पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु, येथील अवघड भूभाग व घनदाट जंगल परिसरामुळे तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नव्हता. दरम्यानच्या काळात जंगलात वीज खांब पडल्याने आणि तांबे-वायरची जोडणी तुटल्याने वीजपुरवठा पूर्ववत करणे अत्यंत आव्हानात्मक बनले होते. अखेर पोलिसांच्या या अथक प्रयत्नांना यश आले असून, १६ नोव्हेंबर रोजी गावात वीज प्रवाहित करण्यात आली आहे.

विकासकामांना गती

नेलगुंडा पोलिस स्टेशनच्या स्थापनेपासूनच या भागातील दीर्घकाळापासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या गावांमध्ये विकासाला मोठी चालना मिळाली आहे. पोलीस दलाच्या सहकार्यातून बोगामी नाल्यावर पूल बांधून देण्यात आल्यामुळे परिसरातील दळणवळण व्यवस्था अतिशय सुलभ झाली आहे. तसेच, नेलगुंडा गावात सोलर लॅम्प बसविण्यात आले आहेत.

२,५०० नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यात आला आहे.

दुर्गम भौगोलिक परिस्थिती, वाहतुकीची कमतरता व सुरक्षेचे प्रश्न असतानाही पोलिस दलाने संबंधित विभागांशी उत्तम समन्वय साधून मोरमेट्टा गावात वीजपुरवठा पूर्ववत केला. यामुळे नागरिकांचे जीवन अधिक सुकर होईल,असा विश्वास आहे.

– एम. रमेश, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

यांनी घेतले परिश्रम

सहायक पोलिस अधीक्षक सागर भामरे, प्रभारी अधिकारी अजिंक्य इथापे, उपनिरीक्षक राहुल जेंगठे, एसआरपीएफचे उपनिरीक्षक मोराणकर, ग्रामसेवक मनमावरे, वरिष्ठ तंत्रज्ञ राजू महाका, गावातील तरुण व अंमलदारांनी मोलाचे श्रम घेतले.

Popular Articles