– डॉ. वैशाली भोजनेंची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली
अमरावती :- नवजात बाळाची साडेतीन लाख रुपयांत विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. वैशाली भोजने यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या १२ वर्षांत सहा नवजात बाळे स्वयंसेवी संस्था किंवा अन्य व्यक्तींकडे दिल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिल्याची माहिती तपास सूत्रांनी दिली आहे. २०१४ ते २०२६ या कालावधीत ही बाळे दिल्याचे त्यांनी मान्य केले आहे. या कबुलीनंतर आता पोलिसांसमोर या सहा बाळांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
डॉ. भोजने यांनी सहा बाळे त्यांच्या पालकांच्या संमतीने दिली होती, असा दावा केला आहे. या व्यवहारात आर्थिक देवाणघेवाण झाली असेल, तर त्याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत जन्माला आलेली ही बाळे त्यांच्या पालकांना नकोशी झाली होती. त्यामुळे त्यांना योग्य कुटुंब मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचा बचाव त्यांनी केला. तसेच, यातील एकही माता अल्पवयीन नव्हती, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले.
मात्र, ही सहा नवजात बाळे नेमकी कोणत्या व्यक्तींकडे किंवा संस्थांकडे देण्यात आली, त्यांचे पालक कोण होते आणि त्यामागे आर्थिक व्यवहार झाला होता का, याचा तपास आता पोलिस करत आहेत.
२० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी भोजने दाम्पत्याची कोठडी वाढवून मागितली होती. सोमवारी फ्रेजरपुरा पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात ठोस युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने डॉ. वैशाली भोजने आणि त्यांचे पती प्रफुल्ल भोजने यांना २० नोव्हेंबरपर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत कथित मानवी तस्करीच्या रॅकेटमधील अन्य व्यक्तींची माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
२४ दिवसांपासून होते फरार
एका साडेसतरा वर्षीय अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती करून तिच्या नवजात बाळाची साडेतीन लाख रुपयांत विक्री करण्याचा कथित सौदा केल्याप्रकरणी भोजने दाम्पत्याविरुद्ध १८ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये मानवी तस्करी, अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. वैशाली भोजने आणि त्यांचे पती प्रफुल्ल भोजने यांनी बुटी प्लॉट येथील भोजने मॅटर्निटी होमला कुलूप लावून पळ काढला होता. तब्बल २४ दिवसांपासून फरार असलेल्या या दाम्पत्याचा पोलिस शोध घेत होते.
दरम्यान, भोजने दाम्पत्य साईनगर-अकोली परिसरात लपून बसल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोघांना ताब्यात घेऊन फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
दोन मोबाइल, कार जप्त
तपासादरम्यान पोलिसांनी भोजने दाम्पत्याने फरार होण्यासाठी वापरलेली गाडी आणि दोन मोबाइल फोन जप्त केले. तसेच, दोघांच्या हस्ताक्षरांचे नमुनेही घेण्यात आले आहेत. प्रफुल्ल भोजने तपासात सहकार्य करत असल्याचे सांगितले जात असले, तरी डॉ. वैशाली भोजने यांच्याकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
व्हायरल ऑडिओची फॉरेन्सिक तपासणी
या प्रकरणात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळेही खळबळ उडाली होती. पीडित अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचा साडेतीन लाख रुपयांत सौदा ठरल्याचा कथित संवाद या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. या क्लिपमधील आवाज डॉ. वैशाली भोजने यांचाच असल्याचा दावा शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला होता.
या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांनी एसीबी आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेशी पत्रव्यवहार केला आहे. १७ नोव्हेंबर रोजी शासकीय पंचांच्या उपस्थितीत डॉ. भोजने यांच्या आवाजाचे नमुने घेण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी उपनिरीक्षक मिलिंद हिवरे यांनी दिली. त्यानंतर हे नमुने व्हायरल ऑडिओशी पडताळण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहेत. या प्रकरणात जयस्वाल नावाच्या व्यक्तीची भूमिकादेखील पोलिस तपासत आहेत.






