spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जगावं की मरावं? महावितरणकडून ६५ युनिट वापरावर तब्बल ₹१ लाखाचं बिल!

तिरोडा तालुक्यातील गांगला गावातील धक्कादायक प्रकार – शेतकरी कुटुंब हतबल
अमरदिप बडगे, गोंदिया जिल्हा (तिरोडा) १८ – विजेशिवाय आज घरातील उपकरणे चालविण्याची कल्पनाही करता येत नाही. पण विजेच्या बिलामुळेच एखाद्या कुटुंबाला “जगावं की मरावं?” असा प्रश्न निर्माण झाला तर? असा धक्कादायक प्रकार तिरोडा तालुक्यातील गांगला गावात उघडकीस आला आहे.तिरोडा तालुक्यातील गांगला गावातील  रहिवासी आशिष अनिल आस्वले या ग्राहकाला केवळ ६५ युनिट वापरावर तब्बल ₹१,०९,४४० चे विजेचे बिल पाठवले आहे. पूर्वी या कुटुंबाला दर महिन्याला सरासरी ₹५०० च्याच आसपास विजेचे बिल येत असताना स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अचानक लाखाभराचे बिल आल्याने शेतकरी कुटुंब हतबल झाले असून “इतकं बिल आलं तर जगावं की मरावं?” असा आक्रोश त्यांनी व्यक्त केला आहे. संबंधित ग्राहकाने महावितरण कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली असली तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. काही महिन्यांपूर्वी स्मार्ट मीटरविरोधात देशभरात आंदोलन झाले होते, आणि या प्रकरणामुळे त्या शंकांना आणखी बळकटी मिळाली आहे. दरम्यान, प्रहार जनसक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी या प्रकरणाची दखल घेत गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे की महावितरणने जर असे अवास्तव बिल सामान्य कुटुंबांवर लादले तर त्यांच्यासमोर कुटुंब चालवण्याऐवजी आंदोलनाचा मार्ग धरावा लागेल.

Popular Articles