मुंबई १८ : राहुल गांधी यांनी नुकतीच सुरू केलेली “व्होट अधिकार यात्रा” देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर फेरफार झाल्याचा दावा केला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात तब्बल एक कोटी नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे, तर कर्नाटकमधील एका विधानसभा मतदारसंघात एक लाखाहून अधिक मतांची चोरी झाल्यामुळे भाजपाचा उमेदवार विजयी झाला. “ही मतं नेहमीच्या मतदारांची नसून नव्याने जोडलेल्या मतदारांची आहेत. आमच्या चौकशीत हे सिद्ध झाले आहे. पण निवडणूक आयोगाने याचे व्हिडीओ पुरावे दाखवण्यास नकार दिला,” असे त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे दावा केला की, निवडणूक आयोग त्यांच्या तक्रारींवर केवळ औपचारिकता पार पाडत असून, अनेक ठिकाणी एफिडेविट्स मागवून सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे. “लोकसभा आणि विधानसभा निवडणुका देशभरात पद्धतशीरपणे चोरी केल्या जात आहेत. आता भाजपाची पुढील रणनीती बिहारची निवडणूकही चोरण्याची आहे. पण आम्ही व बिहारची जनता हे होऊ देणार नाही,” असे राहुल गांधी यांनी ठामपणे म्हटले.
या पार्श्वभूमीवर बिहारमधील विशेष गहन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतून हटवले गेलेले तब्बल ६५ लाख मतदारांचे नावांचे वादळ आणखीनच गहिरं झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने रविवारी या सर्व मतदारांची जिल्हानिहाय यादी आपल्या वेबसाईटवर अपलोड केली. नागरिकांना आता स्वतःचं नाव तपासण्यासाठी व दुरुस्ती करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
राहुल गांधींच्या यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत असून, मतदार यादीतील फेरफार आणि आयोगाच्या कार्यपद्धतीवर आता जनतेतूनही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
सध्या बिहार व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांतील मतदार याद्या आणि निवडणूक आयोगाची भूमिका यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.




