spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडाऱ्यात नवीन बोअरवेल खोदकाम व खोलीकरणावर तात्काळ बंदी

– जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे आदेश; सुरू असलेली कामे थांबवण्याचे निर्देश, उल्लंघन केल्यास होणार कारवाई

हंसराज,भंडारा :- चालू वर्षातील अपुरे पर्जन्यमान आणि जलाशयांतील कमी पाणीसाठ्यामुळे भंडारा जिल्ह्यात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सावन कुमार यांनी जिल्ह्यात नवीन बोअरवेल खोदकामावर तात्काळ प्रभावाने बंदी घातली

आहे. भूजल स्रोतांचे संरक्षण करण्यासाठी आणि सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरील ताण कमी करण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत ते लागू राहणार आहेत.

*कोणत्या कामांवर बंदी*?

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार, जिल्ह्यातील संपूर्ण शहरी व ग्रामीण भागात शासकीय पाणीटंचाई निवारणाची कामे वगळता अन्य सर्व नवीन बोअरवेल (कूपनलिका) खोदकाम तसेच विद्यमान बोअरवेल अधिक खोल करण्याच्या कामांवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी खासगी व्यक्ती, शेतमालक, गृहनिर्माण संस्था, बांधकाम व्यावसायिक, उद्योग, व्यावसायिक आस्थापना तसेच बोअरवेल खोदकाम करणारे कंत्राटदार, रिगमालक आणि यंत्रचालकांना लागू राहील. सध्या सुरू असलेली प्रतिबंधित कामे तात्काळ थांबवून ती ठिकाणे सुरक्षितपणे बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

शासकीय कामे आणि घरगुती वापरासाठी सवलत, पण ‘या’ अटी लागू शासकीय यंत्रणांमार्फत पाणीटंचाई निवारणासाठी आणि सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या बोअरवेल खोदकामांना या बंदीतून वगळण्यात आले आहे. तसेच घरगुती पाणी वापरासाठीचे बोर आणि जुने बोर फ्लश (Flush) करण्याच्या कामांनाही या

बंदीतून सूट देण्यात आली असून, त्यासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसेल. मात्र,या सवलतीसाठी खालील अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक राहील:

– सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या उद्भवापासून (विहीर/विंधन विहीर) ५०० मीटरच्या अंतरादरम्यान कोणत्याही प्रयोजनासाठी खासगी विहीर किंवा विंधन विहीर खोदता येणार नाही.

– नळ पाणी पुरवठा उद्भवाजवळ (५०० मीटरपर्यंत) असलेल्या खासगी विहिरीत इनवेल किंवा आडवे बोअर घेता येणार नाही.

– कोणत्याही परिस्थितीत ६० मीटरपेक्षा जास्त खोलीची विंधन विहीर किंवा कूपनलिका घेता येणार नाही.

– महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम,  २००९ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करणे आवश्यक राहील.

कंत्राटदारांना इशारा आणि कारवाईचा बडगा बोअरवेल कंत्राटदार आणि यंत्रमालकांनी या कालावधीत प्रतिबंधित खोदकामाची कामे स्वीकारू नयेत. शासकीय काम करताना कार्यादेशाची प्रत कामाच्या ठिकाणी ठेवणे बंधनकारक असून, खासगी कामास शासकीय काम असल्याचे भासवून अपवादाचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस विभाग, ग्रामसेवक व तलाठी यांना क्षेत्रीय तपासणीचे निर्देश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन आढळल्यास काम तात्काळ थांबवून संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

विद्यमान बोअरवेल सुरू राहणार या आदेशाद्वारे केवळ नवीन बोअरवेल खोदकाम व बोअर अधिक खोल करण्याच्या कामांवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या (विद्यमान) बोअरवेलचा वापर बंद करण्याचे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत,असेही जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

Popular Articles