spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जमिनीचे योग्य व्यवस्थापन, विकास प्रकल्पांची गती आणि कृषी उत्पादकता वाढविण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन नियोजन, जमिनीचे योग्य व्यवस्थापन, पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी आणि कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढविणे हे घटक महत्वाचे आहेत. त्यादृष्टीने राज्यशासन विविध विकास प्रकल्पांची प्रभावी अमंलबजावणी करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी राज्याच्या विकास प्रकल्पांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अशोककुमार लाहिरी यांच्यासमवेत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाचे आभार मानले. नीती आयोगाकडून राज्याला नेहमीच मार्गदर्शन आणि उपयुक्त सल्ले मिळत आले आहेत. यापुढेही आयोगाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यातील विकासकामे निश्चित गतीने पूर्ण करण्यासाठी शासन कृतीशील असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

निती आयोगाच्या उपाध्यक्षांकडून वाढवण बंदराच्या कामाबाबत समाधान

बैठकीत जमीन अधिग्रहणाच्या दीर्घकालीन नियोजनावर विशेष भर देण्यात आला. जमीन अधिग्रहण, पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत, असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अशोककुमार लाहिरी यांनी सांगितले. जमिनीचा विकास आणि योग्य व्यवस्थापनातून मोठ्या प्रमाणात महसूल निर्माण होऊ शकतो, असे डॉ. लाहिरी यांनी नमूद केले. भविष्यातील विकास प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे आगाऊ अधिग्रहण करून त्याचे योग्य व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. आज कमी किमतीत उपलब्ध असलेली जमीन भविष्यात अधिक मूल्यवान ठरू शकते. त्यामुळे पुढील पिढ्यांचा विचार करून महत्वाकांक्षी जमीन अधिग्रहण धोरण आखण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी वाढवण प्रकल्पाच्या कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

बैठकीस परिवहन व बंदरे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष गौरव दयाल, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व यंत्रणाप्रमुख उपस्थित होते.

बैठकीत राज्याच्या दीर्घकालीन विकासाचे नियोजन, जमीन अधिग्रहण व व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि विविध विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

Popular Articles