· लोकभवनच्या इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक वारशावरील चार पुस्तकांचे प्रकाशन
मुंबई :- लोकभवनचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. आपल्या भूतकाळाची जाणीव ठेवून वर्तमानात जगणे आणि भविष्यातील पिढ्यांना इतिहासाची ओळख करून देणे महत्वाचे आहे. लोकभवनमधील ऐतिहासिक वस्तू, मेजवानीच्या परंपरा, पाककला आणि नैसर्गिक वैभव यांचे दस्तऐवजीकरण करणारी पुस्तके या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतील, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
लोकभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते लोकभवनच्या इतिहास व वारशावर आधारित तीन कॉफी टेबल पुस्तके आणि मोरांच्या छायाचित्रांचा विशेष कॅटलॉग अशा चार प्रकाशनांचे अनावरण करण्यात आले. यावेळी या पुस्तकांच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
राज्यपाल म्हणाले की, लोकभवनमधील ब्रिटिश कालीन ऐतिहासिक कटलरी, क्रॉकरी, पोर्सिलिन आणि चांदीची भांडी या केवळ वापराच्या वस्तू नसून इतिहासाच्या महत्वपूर्ण नोंदी आहेत. त्यातून तत्कालीन जीवनशैली, कलात्मकता आणि त्या काळातील परंपरांचे दर्शन घडते. या वस्तूंची निर्मिती अत्यंत मेहनतीने आणि कलात्मक पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे जतन आणि दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे. यापूर्वी तेलंगणाचे राज्यपाल असताना हैदराबाद येथील सालार जंग संग्रहालयाचे अध्यक्ष होतो. त्यावेळी आपण ऐतिहासिक वस्तूंचे महत्व जवळून अनुभवले असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकभवनमधील मोरांची छायाचित्रे हा देखील एक वैशिष्ट्यपूर्ण ठेवा आहे. मुंबईसारख्या महानगरात मलबार हिल परिसरात मुक्तपणे वावरणारे मोर पाहणे ही सर्वांकरिताच अनोखी बाब आहे. त्यामुळे या मोरांच्या छायाचित्रांचा संग्रह तयार करून त्याची नोंद पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांच्या मेजवानी संदर्भातील पुस्तकाविषयी राज्यपाल वर्मा म्हणाले की, विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांच्या भेटी, त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ आणि काळानुसार बदललेले मेन्यू यांची माहिती या पुस्तकात आहे. खाद्यसंस्कृतीचा संबंध केवळ पोट भरण्याशी नसून ती संबंधित देशाच्या संस्कृतीचा अनुभव देणारी असते. पाककला ही कौशल्य, सर्जनशीलता आणि कलात्मकतेची अभिव्यक्ती आहे. त्यामुळे पाककलेचे दस्तऐवजीकरणही महत्वाचे आहे.
महाराष्ट्रातील लुप्त होत चाललेल्या कलांचे जतन करण्यासाठी स्वतंत्र पुस्तक प्रकाशित करण्याचा मानसही राज्यपालांनी व्यक्त केला. वारली कलेला केवळ संग्रहालये आणि प्रदर्शनांपुरते मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनात स्थान मिळावे, यासाठी शाळांच्या वर्गखोल्या आणि अंगणवाड्यांमध्ये वारली चित्रकला साकारण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध शाळेच्या वारली पेंटिंगने वर्गखोल्या रंगविण्याच्या उपक्रमाची माहिती देताना राज्यपाल म्हणाले की, सुमारे ३० शाळांचे मुख्याध्यापक या शाळेला भेट देणार आहेत. वारली कलेच्या माध्यमातून बालगीते आणि पौराणिक कथाही साकारता येतील. यामुळे लहान वयातच मुलांना पारंपरिक कलेची ओळख होईल.
प्रकाशित करण्यात आलेली पुस्तके लोकभवनच्या कपाटांमध्ये मर्यादित न ठेवता शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांपर्यंत पोहोचवावीत, असे निर्देशही राज्यपालांनी दिले. ही पुस्तके डिजिटल स्वरूपातही उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पारंपरिक पुस्तक असो किंवा डिजिटल माध्यम, वाचनातूनच ज्ञान आणि अनुभवाची भर पडते. वाचन हे जगाकडे पाहण्याची खिडकी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
चार पुस्तकांतून लोकभवनच्या वारशाचे दस्तऐवजीकरण – जनसंपर्क अधिकारी, उमेश काशीकर
या कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आलेल्या चारही पुस्तकांचा परिचय आणि माहिती लोकभवनचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी दिली.
‘लोकभवन पत्रिका २०२६’ या पहिल्या कॉफी टेबल पुस्तकात मार्च ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत राज्यपालांनी केलेले दौरे, विविध कार्यक्रमांमधील सहभाग, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यवरांच्या भेटी, नशामुक्त भारत अभियान, आदिवासी कल्याणविषयक उपक्रम, विद्यापीठांचे कुलपती म्हणून केलेले कार्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची छायाचित्रांसह माहिती संकलित करण्यात आली आहे.
बँक्वेट्स ऑफ डिप्लोमसी : मेन्यूज फ्रॉम महाराष्ट्र लोकभवन १९९०-२०२६’ या दुसऱ्या पुस्तकात लोकभवनमध्ये गेल्या ४० वर्षांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध मेजवान्यांचे मेन्यू कार्ड, त्यावेळी उपस्थित असलेले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यवर आणि संबंधित छायाचित्रांचा समावेश आहे. तत्कालीन खाद्यसंस्कृती आणि पाहुणचाराच्या परंपरेतील बदलांचे दर्शन या पुस्तकातून घडते.
‘ पॅन्ट्री हेरिटेज ऑफ महाराष्ट्र लोकभवन’ या तिसऱ्या पुस्तकात लोकभवनमधील स्वातंत्र्यपूर्व काळातील ऐतिहासिक कटलरी, क्रॉकरी, चांदीची भांडी आणि पोर्सिलिनच्या वस्तूंचे छायाचित्रांसह दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. या वस्तूंची नावे, उपयोग आणि ऐतिहासिक महत्व यांची माहितीही देण्यात आली आहे.
चौथे प्रकाशन लोकभवन परिसरातील मोरांच्या छायाचित्रांचा विशेष कॅटलॉग आहे. दैनिक ‘सामना’चे छायाचित्रकार सचिन वैद्य यांनी गेल्या १५ ते २० वर्षांत टिपलेल्या मोरांच्या छायाचित्रांचा या पुस्तिकेमध्ये समावेश आहे.
यावेळी उमेश काशीकर यांनी या चारही प्रकाशनांची संकल्पना, निर्मिती प्रक्रिया आणि त्यामागील प्रयत्नांची माहिती दिली. लोकभवनमधील एका कोपऱ्यात उपलब्ध असलेली जुनी मेन्यू कार्ड्स, ऐतिहासिक वस्तू आणि कटलरी यांचे महत्व लक्षात घेऊन त्यांचे संकलन व दस्तऐवजीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ॲटलस स्किलटेक विद्यापीठाचे सहकार्य घेण्यात आले. विविध मान्यवरांच्या भेटींची जुनी छायाचित्रे आणि मेन्यू कार्ड्स एकत्रित करून त्यांची माहिती पुस्तकात समाविष्ट करण्यात आली. तसेच ऐतिहासिक कटलरी आणि चांदीच्या भांड्यांची छायाचित्रे घेऊन त्यांची नावे व वैशिष्ट्ये तज्ज्ञांच्या मदतीने संकलित करण्यात आली. मोरांच्या छायाचित्रांचा स्वतंत्र कॅटलॉग तयार करण्यासाठी छायाचित्रकार सचिन वैद्य व डिझायनर प्रशांत जाधव यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी विविध संस्था, तज्ज्ञ आणि प्रायोजकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन केले. त्यांनी या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा परिचय करून दिला.
मान्यवरांचे योगदान
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पुस्तकांच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास चिकित्सक समूहाचे सचिव गुरुनाथ पंडित, पाटकर-वर्दे महाविद्यालयाच्या हॉस्पिटॅलिटी अँड केटरिंग विभागाच्या विभागप्रमुख तथा मुख्य शिक्षण अधिकारी डॉ. माला खारकर, पाटकर महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. शेफ अमोल राऊळ, ॲटलस स्किलटेक विद्यापीठाच्या शिक्षणतज्ज्ञ व प्रमुख डॉ. इंदू शहानी, विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थ शहानी, कुलसचिव डॉ. पराग अमिन, प्रा. मानसी कक्कर, प्रा. कनुप्रिया शर्मा, शांतनू घुरियानी, चार्वी किंजर आणि काशिश शाह उपस्थित होते.
पुस्तकांच्या निर्मिती व मांडणीमध्ये ॲटलास स्किलटेक विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी खाद्यसंस्कृती विषयावरील लेखाच्या लेखिका आर्किटेक्ट उर्मी पोपट उपस्थित होत्या. प्रकाशनांसाठी प्रायोजकत्व देणाऱ्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) वतीने सीजीएम व राज्य समन्वयक (तेल उद्योग) मिहिर जोशी,महाराष्ट्र राज्य समन्वयक (रिटेल) अमित कुमार सोंकुसरे आणि रितेश जाधव उपस्थित होते.
छायाचित्र प्रदर्शनासाठी फलक उपलब्ध करून देण्यास सहकार्य करणारे रवींद्र संघवी व सुचेता संघवी आणि छायाचित्रकार सचिन वैद्य व सुधारक ओलवे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे छायाचित्रकार विरेंद्र धुरी आणि योगेश तांदळे यांना देखील त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.






