– टेलिफोन एक्सचेंज चौकातील कचऱ्याची एका दिवसात विल्हेवाट
– नागपूर महानगरपालिकेची तातडीने कार्यवाही
नागपूर :- नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची वेळेत दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने पुन्हा एकदा तत्परतेने कार्यवाही केली आहे. टेलिफोन एक्सचेंज चौकाजवळ प्रभाग क्रमांक ८ मधील परिसरात रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचरा साचल्याने परिसरातील नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत होता. याबाबत एका जागरूक नागरिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांच्याकडे समस्या मांडली.
नागरिकांच्या या तक्रारीची तातडीने दखल घेत शिवानी दाणी वखरे यांनी संबंधित यंत्रणेला आवश्यक कार्यवाही करण्याबाबत निर्देशित केले. त्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने तत्परतेने कार्यवाही करत अवघ्या एका दिवसात संबंधित परिसरातील साचलेला कचरा उचलून परिसर स्वच्छ केला.
महापौर निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नागरिकांनी सोशल मीडिया सारख्या माध्यमातून मांडलेल्या स्थानिक समस्यांची दखल घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करणे, हा प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयाचा सकारात्मक परिणाम आहे.
स्वच्छ, सुंदर आणि निरोगी नागपूर घडविण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि महानगरपालिका प्रशासनाची तत्परता या दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. नागरिकांनीही आपल्या परिसरातील स्वच्छतेबाबत जागरूक राहून समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.






