हंसराज,भंडारा :- नागरिकांची जागरूकता आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे भंडारा पोलिसांनी मध्यरात्रीच्या दोन स्वतंत्र कारवायांत घरफोडी करणाऱ्या नागपूरच्या सराईत गुन्हेगारांसह ट्रॅक्टरची बॅटरी चोरणाऱ्या दोघांना रंगेहात अटक केली आहे.
पहिल्या घटनेत, शहरातील गुजराती कॉलनीतील एक कुटुंब १८ नोव्हेंबर रोजी बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून ८ ग्रॅम सोन्याची अंगठी व मौल्यवान ऐवज चोरला. २२ नोव्हेंबरच्या मध्यरात्री दोन वाजता शेजाऱ्यांकडून चोरीची माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ ‘डायल ११२’ वर संपर्क साधला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेत घराच्या आतमध्येच असलेले नावेद शहा अब्बास शहा (वय २६) व अस्लम शरीफ खान (वय २३, रा. यशोधरा नगर, नागपूर) या सराईत गुन्हेगारांना पकडले. या दोघांविरुद्ध नागपूर जिल्ह्यात चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.
दुसऱ्या घटनेत, २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्री अडीच वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला होंडा अॅक्टिवा मोपेडवरून संशयास्पदरीत्या जाणारे महेश पुरुषोत्तम नंदनवार (वय ४२) व पवन नरेंद्र नगरारे (वय ४०, रा. भंडारा) आढळले. तपासणीत त्यांच्याकडे ६,२०० रुपये किमतीची अमॅरॉन कंपनीची बॅटरी सापडली. चौकशीत ही बॅटरी मधुकर धुर्वे यांच्या ट्रॅक्टरमधून चोरल्याचे निष्पन्न झाले.
दोन्ही प्रकरणी गुन्हे दाखल करून चारही आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी व भंडारा पोलीस पथकाने केली.
दरम्यान, नागरिकांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवावेत व रात्रीच्या वेळी वाहने सुरक्षित ठेवावीत. संशयास्पद हालचाल दिसल्यास स्वतः धोका न पत्करता तात्काळ ‘डायल ११२’ वर माहिती द्यावी, तसेच मध्यरात्री विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.






