spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रीय लोकअदालत १२ डिसेंबर रोजी

हंसराज,भंडारा :- न्यायालयात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली प्रकरणे सामोपचाराने आणि जलदगतीने निकाली काढण्यासाठी शनिवार, १२ डिसेंबर २०२६ रोजी भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालय, भंडारा तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील दिवाणी व फौजदारी न्यायालयांमध्ये ही लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे.

या लोकअदालतीच्या माध्यमातून दोन्ही पक्षकारांच्या परस्पर संमतीने हजारो प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः मोटार अपघात नुकसानभरपाईच्या प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा तडजोडीने निपटारा होऊ शकतो. न्यायालयीन प्रक्रियेला लागणारा दीर्घ कालावधी, खर्च आणि मानसिक ताण टाळून नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळविण्यास लोकअदालत उपयुक्त ठरणार आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेल्या तसेच अद्याप न्यायालयात दाखल न झालेल्या (वादपूर्व) प्रकरणांचाही तडजोडीसाठी समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने धनादेश अनादर (चेक बाऊन्स/कलम १३८ एन.आय. ॲक्ट) प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई दावे, कौटुंबिक वाद, वीज व पाणी बिलासंबंधी वाद, कामगारविषयक वाद तसेच तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे.

लोकअदालतीमुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचण्यासोबतच परस्पर सामंजस्यातून वाद मिटविण्याची संधी मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या प्रलंबित प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. इच्छुक पक्षकारांनी आपल्या वकिलांमार्फत किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा तसेच संबंधित तालुका विधी सेवा समितीकडे संपर्क साधावा.

या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा यांनी केले आहे.

Popular Articles